संगमनेरात अवैध धंदे फोफावले !
मटका – जुगार अड्डे, गांजाचा धुमाकूळ !!
एलसीबीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
संगमनेर प्रतिनिधी दि. 19
सत्ताधारी बदलल्यानंतर संगमनेरात अवैध धंधांचा सुळसुळाट झाला असून मटका अड्डे, गांजा, जुगार अड्डे, वाळू तस्करी, गुटखा तस्करी अवैध विक्री अशा अनेक उद्योगांनी संगमनेर शहरात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहर पोलिसांचे यास सहकार्य असल्याचे चित्र असून सामाजिक संस्था संगमनेरचे नागरिक आणि विविध संघटनातील पदाधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी रस्त्यावर येण्याचा इशारा द्यावा लागला आहे.

नगर एलसीबीने गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरच्या बहुचर्चित मटका अड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच दररोज मटका टपऱ्यांवर छापे घालून एकाच दिवशी दोन दोन चार गुन्हे दाखल करण्याचा सपाटा एलसीबी आणि संगमनेर शहर पोलिसांनी लावला होता. परंतु काही दिवस हा खेळ चालल्यानंतर संगमनेरातले सेटलमेंट झाल्यानंतर पुन्हा जोमाने मटका अड्डे सुरू झाले. तेव्हापासून या अवैध धंद्यावर छापे पडण्याचे बंद झाले आहे.

संगमनेर शहरातल्या प्रमुख चौकांबरोबरच उपनगरांमध्ये देखील हा व्यवसाय तेजित आहे. शहरातील अगदी बस स्थानक शिवाजी पुतळा परिसरात असणाऱ्या शक्तिमान टॉवर्स या व्यावसायिक कॉम्प्लेक्स मध्ये सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे गाळे आहेत. यामध्ये लोटो गेम चक्री गेम मटका आकडे घेणारे टपरी जुगार अड्डा यासह अनेक प्रकार सुरू आहेत. शहर पोलिसांकडे या संबंधी देखील अनेक तक्रारी झाल्या आहेत.

दिल्ली नाका तीन बत्ती चौक या ठिकाणी अवैध बेकायदेशीर दुकानांमधून देशी दारू विकली जाते त्याचीही तक्रार झाली आहे. शहरातील बऱ्याच पान टपऱ्यांमधून गांजा भरलेल्या सिगारेट्स उपलब्ध होतात. मालदार रोड सारख्या गजबजलेल्या परिसरात गर्द, गांजा टपऱ्यांमधून नेहमीच सापडतो असे सर्व प्रकार सध्या संगमनेराज सुरू आहेत.

पोलिसांना साईड उत्पन्न मिळत असल्याने मटका अड्डे आणि जुगारांचे क्लब मात्र बंद होत नाहीत. अस्तित्वात नसलेल्या म्हाळुंगी नदीकाठीवरच्या माधव चित्र मंदिराच्या परिसरात असलेला जुगार अड्डा नेहमीच जागा बदलून सुरू असतो. तीन बत्ती चौक परिसरात असणाऱ्या मुख्य मटका किंग च्या अड्ड्यांवर कधीच कारवाई होत नाही. विशेष म्हणजे या अवैध धंद्यांनी शहराची शांतता व सुव्यवस्था देखील अडचणीत येत असल्याची देखील तक्रार करण्यात आली असून यासंदर्भाने लवकरच आंदोलन केले जाणार आहे.
