संगमनेरचा सुजलाम सुफलाम सहकार मोडण्याचे प्रयत्न !
ज्यांनी राहुरीसह इतर कारखाने मोडकळीस आणले त्यांचा आता संगमनेरवर डोळा — सभासदांचा विखे यांच्यावर आरोप
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 4
संपूर्ण राज्यात अतिरेकी विचारांच्या राजकारण्यांकडून सहकार क्षेत्र मोडकळीस आणण्याचे छुपे कारस्थान सुरू आहे. नगर जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी अशा छुप्या कार्यास सत्तेच्या हव्यासापायी पाठिंबा देऊन जिल्ह्यातील काही कारखाने मोडकळीस आणले. सहकार खिळखिळा करण्याचा प्रयत्न केला. कारखाने बंद पाडले. आजही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशाही अवस्थेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातला सहकार फुलवला, वाढवला आहे. संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराला पूर्ण राज्यात तोड नाही. अतिशय पारदर्शक आणि विकसनशील कारभार या कारखान्याकडून केला जात आहे. आता नगर जिल्ह्यात ज्यांनी राहुरी सारखा कारखाना बंद पाडला. तिथला सहकार खिळखिळा केला.असे विकासाच्या विरोधात असणारे अतृप्त नेते संगमनेर कारखान्याचा सहकार उध्वस्त करायला निघाले आहेत असे अनेक आरोप सभासदांमधून होत आहेत.

घुलेवाडीच्या खडकाळ माळरानावर अनेक समस्यांचा सामना करीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साखर कारखाना उभा केला, सुरू केला आणि तो चांगल्या पद्धतीने चालवला देखील. कारखान्याचे शेअर्स गोळा करण्यासाठी करण्यात आलेली पायपीट, आलेल्या अडचणी आणि कारखाना उभा करण्यासाठी आलेली संकटे याचा इतिहास सर्वश्रुत आहे. बाळबोध आणि फक्त आरोप करणाऱ्या मंडळींनी हा इतिहास अवश्य वाचावा. यासाठी सहकार्य केलेल्या काही मंडळींच्या नावाने उदो उदो केला जात आहे. त्यांचा कारखाना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात अडकला आहे. गुन्हे दाखल झाले आहेत. संचालक मंडळच भ्रष्ट निघाले आहे. त्यांचे नेते देखील त्यांच्या पाठीशी उभे असल्याने त्यांची सुद्धा लायकी समोर आली आहे. याचा विचार सर्वांनी करायला हवा अशा विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. त्याचबरोबर प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील सुरू आहे. या निवडणुकांच्या गदारोळात विखे – थोरात समर्थकांमध्ये सोशल मीडिया मधून आरोपांच्या फैरी झडत आहेत. प्रत्यक्ष सभासदांमधून फिरून माहिती घेतली असता वरील प्रकारच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे ऐकण्यास मिळतात. त्यामुळे यावेळीची निवडणूक ही चुरशीची, आरोप प्रत्यारोपाची आणि वादावादीची देखील होण्याची चिन्हे दिसत आहेत.

थोरात कारखान्याची निवडणूक बऱ्याच वेळा बिनविरोधपणे पार पडली आहे. परंतु विधानसभेत पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात विरोधकांनी डोके वर काढले असून आता सहकारात देखील घुसण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आमदार अमोल खताळ यांनी विखे पाटलांच्या सहकार्याने तशी तयारी सुरू केली आहे. थोरात यांचे पारंपारिक विरोधक सध्या रिटायरमेंटची पेन्शन घेत आहेत. त्यामुळे शहरातली काही मंडळी निवडणुकीच्या उड्या मारत आहे. मात्र नगरपालिका विधानसभा शहराच्या निवडणुका आणि शेतकऱ्यांशी संबंधित त्यांची कामधेनू असणाऱ्या साखर कारखान्याची निवडणूक यात फरक असल्याचे सोशल मीडियावरील बोलबच्चन कार्यकर्त्यांना ठाऊक नसल्याचे देखील दिसते. त्यामुळे शहरात विरोधकांनी निवडणूक लढवताना फक्त विखे बॅनर वापरून कारखान्याची बदनामी चालवली असल्याचा आरोप देखील थोरात समर्थक कार्यकर्ते आणि सभासदांमधून होत आहे. मुळात विखे पिता पुत्रांना संगमनेरचा सहकार मोडीत काढायचा आहे असा आरोप देखील होत आहे.

