गाथा पुनरुत्थान दिनाच्या निमित्ताने ..
31 मार्च 2025 रोजी गाथा पुनरुत्थान दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गाथा परिवारचे अध्यक्ष उल्हास पाटील यांनी लिहिलेला हा लेख वाचकांसाठी देत आहोत.
तुकाराम महाराजांचं शुद्ध चारित्र्य, त्यांना समाजाच्या हिताची असलेली कळकळ, समाजाला शहाणं करण्याची तळमळ, त्यांचा प्रामाणिकपणा यांचा समाजावर मोठा परिणाम होत होता. तुकाराम महाराजांची भाषा ही साधी, सरळ आणि सामान्य माणसाला सहज कळणारी होती. त्यांचे दृष्टांत रोजच्या जीवनातले आणि सामान्यातल्या सामान्य माणसाच्याही नित्य अनुभवातले होते. “निवडावे खडे l तरी दळण वोजे घडे ll”; “निवडावे तन l शेत करावे राखण ll”; “कन्या सासुऱ्याशी जाये l मागे परतोनि पाहे ll”; “अर्भकाचे साटीं l पंते हाती धरिली पाटी ll बालकाचे चाली l माता जाणूनि पाऊल घाली ll” अशा रोजच्या जीवनातले, सर्वांना परिचित असलेले साधे, सोपे पण सुंदर आणि समर्पक दाखले तुकाराम महाराज आपल्या अभंगातून देत. त्यामुळे सामान्य लोकांना ते फार भावत होतं. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला त्यामुळे मोठी गर्दी होऊ लागली होती. त्यांची कीर्ती तर वाऱ्यावर पसरत होती हे त्यांनीच,
“कोण सांगायाला l गेले होते देशोदेशी ll
समर्थ तो माझा बाप l वाऱ्या हाती नेलें माप ll”
या शब्दात नोंदवून ठेवलेलं आहे. आदींना होऊ लागला.
तुकाराम महाराजांनी आपल्या वडिलोपार्जित मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि त्या मंदिरात ते भजन, कीर्तन करत. मंबाजी कीर्तनात यायचा आणि तुकाराम महाराजांना वेडेवाकडे प्रश्न विचारायचा. आपल्या भजन-कीर्तनात अडथळे आणले जातात आणि त्याचं मला मरणप्राय दु:ख होतं असं तुकाराम महाराजांनी, “भजनी विक्षेप ते चि पै मरण l” या शब्दात लिहून ठेवलं आहे.

मंबाजी आणि सालोमालो यांच्यासारख्यांना राग येत असला तरी सामान्य जनतेला तुकाराम महाराज यांचं कीर्तन आवडत होतं. तुकाराम महाराज जुन्नरपासून लोहगाव, वाघोली, मावळ प्रांत सर्वत्र ते फिरत. कीर्तनातून लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करत. शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनाला येत असा उल्लेख आढळतो. तुकाराम महाराजांची कीर्ती रामेश्वर भटाच्या कानावर गेली. तुकाराम महाराज शूद्र असूनही ब्राह्मण त्यांच्या पाया पडतात, त्यांच्या काव्यातून श्रुती म्हणजे वेदार्थ प्रकट होतो असंही त्याला समजलं. तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून त्याच्या मनात मत्सर जागा झाला. त्याने दिवाणाकडे तक्रार केली. महिपती लिहितो, ‘देशोधडी करावा तुका’ असा विचार मनात धरून रामेश्वर भटाने,
“ऐसे म्हणोनिया मनांत l भीड खर्चिली दिवाणात l
म्हणे तुका शूद्र जातीचा निश्चित l श्रुतीमतितार्थ बोलतो ll
हरिकीर्तन करुनि तेणें l भाविक लोकांसी घातले मोहन l
त्यासी नमस्कार करिती ब्राह्मण l हे आम्हांकारणे अश्लाघ्य ll
सकळ धर्म उडवूनि निश्चित l नाममहिमा बोले अद्भुत l
जनात स्थापिला भक्तिपंथ l पाखांड मत हे दिसें ll”
तुकाराम महाराज भक्तिमार्गाचा प्रचार करतात आणि तो करत असतानाच पूजाअर्चा, होमहवन, यज्ञयाग, तीर्थाटण, दानधर्म आदी सर्व मार्गांचा निषेध करतात असंही त्याला समजलं. यामुळे तो जास्तच संतप्त झाला. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जपजाप्य, होमहवन, यज्ञयाग, व्रतवैकल्ये, तीर्थाटणं, दानधर्म हे सर्व तुकाराम महाराजांच्या उपदेशाने नष्ट होणार होतं. रामेश्वर भट, मंबाजी, सालोमालो आदींना हीच चिंता होती. कारण हेच तर त्यांचे पोट भरण्याचे मार्ग होते. सर्व लोक भक्तिपंथाला लागले तर ब्राह्मणांचं सर्व समाजावरचं वर्चस्वच नष्ट होईल अशी भीती वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांना सतावत होती. मंबाजीने आपाजी गोसाव्याला लिहिलेल्या पत्रात ही भीती स्पष्ट व्यक्त केली आहे. त्यात आपलं राज्य बुडेल असं मंबाजी म्हणतो.
ब्राह्मण तुकाराम महाराजांच्या पाया पडतात हे अश्लाघ्य आहे असं रामेश्वर भट म्हणतो. कारण, मनुस्मृतीनुसार ब्राह्मणाचा दहा वर्षांचा अज्ञानी मुलगा हा साठ वर्षांच्या ज्ञानी व तपस्वी शूद्रापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणून साठ वर्षांच्या ज्ञानी व तपस्वी शूद्राने ब्राह्मणाच्या दहा वर्षांच्या अज्ञानी मुलाच्या पाया पडल्या पाहिजेत असा दंडक आहे. ब्राह्मणाने कधीही शूद्राच्या पाया पडायच्या नसतात. त्याचप्रमाणे वर्णव्यवस्थेत गुरु होण्याचा व ज्ञान देण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे, म्हणून शूद्र गुरु होऊ शकत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, शूद्राला वेद ऐकायचाच अधिकार नाही, आणि शूद्राने वेदांवर भाष्य करणं, त्यावर टीका करणं हा तर भयंकर अपराध आहे. अशा परिस्थितीत तुकाराम महाराज वेदांचा अर्थ आम्हालाच ठावूक आहे असंही म्हणत होते; वेद वांझ आहेत, नपुंसक आहेत असंही म्हणत होते; आणि कीर्तनातून सर्वाना उपदेशही करत होते. जरी ते स्वत:ला कोणाचे गुरु म्हणवत नसले तरी अनेक ब्राह्मणही त्यांना गुरु मानत होते. मनुस्मृतीच्या नियमानुसार तुकाराम महाराजांनी केलेले हे सर्व गुन्हे अतिशय गंभीर होते.

धर्मपीठासमोर खटला :
१६३८ मध्ये रामेश्वर भटाने तुकाराम महाराजांना दिवाणाच्या माध्यमातून धर्मपीठापुढे खेचलं. तुकाराम महाराजांच्या अभंगात याचा उल्लेख येतो. ते म्हणतात,
“नाही मागितला l तुम्हां मान म्यां विठ्ठला ll
जे हे करविली फजिती l माझी एवढी जना हातीं ll
नाही केला पोट l पुढें घालूनि बोभाट ll
तुका म्हणे धरुनि हात l नाहीं नेलें दिवाणात ll”
तुकाराम महाराज म्हणतात की मी तुझ्याकडून मानप्रतिष्ठेची अपेक्षा केली नाही, मग तू माझी या लोकांकडून एवढी फजिती का करवलीस ? तू माझ्या पोटाला देत नाहीस म्हणून त्याचा बोभाटा करून तुझी मी दिवाणाकडे तक्रार केली नाही. मग तरी तू मला दिवाणात उभं करून माझी एवढी फजिती का करवलीस?
दिवाणाने चारचौघा न्याय केला. न्यायदानाचा अधिकार शूद्रांना नव्हताच, म्हणजे न्याय देणारेही ब्राह्मणच होते. त्या कोर्टात फिर्यादीही तेच होते आणि न्यायाधीशही तेच होते. शिवाय डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘तैत्तिरीय संहिता’ असं सांगते की ब्राह्मण आणि अब्राह्मण यांच्या भांडणात न्यायाधीशाने नेहमी ब्राह्मणाच्या बाजूनेच निकाल दिला पाहिजे.” असा नियम आहे. वैदिक पंडित वा त्याच्या कर्मकांडावर शूद्राने टीका करणं, शूद्राने ब्राह्मणाचे दोष दाखवणं हा ब्राह्मणी धर्मानुसार गुन्हाच होता. आपस्तंभ धर्मसूत्र म्हणते कि एखाद्या शूद्राने ब्राह्मणाची निंदा केली तर त्याची जीभ छाटावी. वाणी, मार्ग, शय्या, आणि आसन याबाबतीत शूद्राने ब्राह्मणाची बरोबरी केली तर त्याला काठीने बडवावे. जिथे कायदेच असे पक्षपाती असतील, तिथे न्यायाची अपेक्षा कशी करायची ? तिथे न्याय कसा मिळणार ? निकाल आधीच ठरलेला होता. मनुस्मृती असं सांगते की एखादा शूद्र जर वरच्या जातीची कर्मे करत असेल तर राजाने त्याचं धन जप्त करावं आणि त्याला राज्यातून ताबडतोब हाकलून द्यावं. “देशोधडी करावा तुका” असा विचार रामेश्वर भट करतो त्याला हा आधार आहे. तर्कशास्त्राच्या आधारे एखादा द्विज जरी श्रुती आणि स्मृतीची चिकित्सा करील तर त्याच्यावर बहिष्कार घालावा असं मनुस्मृती सांगते. जर श्रुती आणि स्मृतीची चिकित्सा करणाऱ्या ब्राह्मणावरही बहिष्कार घातला जात असेल तर शूद्राला नक्कीच त्यापेक्षा कठोर शिक्षा सुनावली जाईल यात शंका काय ?

अभंग बुडवण्याची आणि घरदार जप्तीची शिक्षा :
धर्मपीठाने तुकाराम महाराजांना त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची सजा फर्मावली. त्याचबरोबर त्यांची संपत्ती, घरदार, जमीनजुमला जप्त करणे, बहिष्कार घालणे आणि गावातून हकालपट्टी करणे अशा आणखी तीन शिक्षा फर्मावण्यात आल्या. यामुळे तुकाराम महाराजांची अवस्था कशी झाली ते सांगताना तुकाराम महाराज लिहितात,
“काय खावें आता कोणीकडे जावें l गावात रहावें कोण्या बळें ll१ll
कोपला पाटील गांवचे हे लोक l आतां घाली भीक कोण मज llधृll
आतां येणें चवीं सांडिली म्हणती l निवाडा करिती दिवाणात ll२ll
भल्या लोकीं यांस सांगितली मात l केला माझा घात दुर्बळाचा ll३ll
तुका म्हणे यांचा संग नव्हें भला l शोधीत विठ्ठला जाऊं आता ll४ll
तुकाराम महाराजांचं घरदार, अन्नधान्यासह आणि भांडीकुंडी आदी सर्व सामानासह जप्त करण्यात आलं. डॉ. आ. ह. साळुंखे लिहितात, “त्यांचं (तुकाराम महाराजांचं) घर आणि दुकान रात्रीच्या अंधारात कसं लुटण्यात आलं त्याचं ह्रदयद्रावक वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्यांच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेला इतरांचा मालही लुटला गेल्याने त्याच्या भरपाईसाठी त्यांना घरही न्यायालयाकडे अमानत ठेवावं लागलं. भीक मागून खायचं तर बहिष्कार टाकल्याने त्यांना कोणी भीकही घालू शकत नव्हतं वा मदत करू शकत नव्हतं. तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात नोंदवतात की भल्या लोकांत मी यांच्यावर मात केली, म्हणून यांनी मला दिवाणात खेचून तिथे निवाडा केला. याचा अर्थ दिवाणात जे न्यायदानाला बसले होते ते भले नव्हते, बदमाश होते. त्या दुष्टांच्या गराड्यात तुकाराम महाराज कितीही खरे असले, त्यांची बाजू कितीही सत्याची असली तरी ते तरी दुबळे ठरले. सर्वस्वच हिरावून घेतल्यावर आता करायचं काय ? समजा गाव सोडून गेले असते तरी तिथे हा ससेमिरा मागे लागलाच असता. अशा असहाय्य परिस्थितीत तुकाराम महाराजांनी आपल्या प्राणप्रिय अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. त्यांना त्या बुडवाव्या लागल्या.

अठरा दिवसांचं उपोषण:
तुकाराम महाराजांना घरदार जप्त झाल्याचं काही वाटलं नाही. ऐहिक संपत्तीचा मोह तर कधीच गळून पडला होता. पण अभंगाच्या वह्या बुडवाव्या लागल्या ही गोष्ट त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागली. अभंग हे त्यांच्या ह्रदयातून आलेले शब्द होते. तुकाराम महाराज काही स्वानंदासाठी, आत्मसुखाय लिहित नव्हते, त्यामुळे आपल्याला धन वा मानप्रतिष्ठा मिळावी या अपेक्षेने लिहित नव्हते, बक्षिसाच्या वा पुरस्काराच्या अपेक्षेने लिहित नव्हते. त्यांना समाजाला शहाणं करायचं होतं. “त्यांनी “ज्ञानदीप लावू जगती l” चा वसा स्वीकारला होता. त्यांनी हे आपलं जीवनकार्य म्हणून स्वीकारलं होतं. त्यासाठीच सावकारी, व्यापार सर्व सोडून दिलं होतं. एकदा एखादा वसा घेतला तर तो कोणत्याही परिस्थितीत टाकायचा नसतो. आता तेच काम करायचं नाही तर मग जगायचं कशासाठी असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला होता. तुकाराम महाराजांनी अन्नपाणी सोडलं. तिथेच इंद्रायणीच्या काठी एका शिळेवर अंग झोकून दिलं. आपण शूद्र म्हणून जन्माला आलो हे पाप आहे का? चराचरात ब्रह्म आहे सांगणारे हे ढोंगी, दांभिक ब्राह्मण आम्हा शूद्रांना इतकं तुच्छ लेखतात. येता जाता अपमान करतात. हिणवतात. समाजाने डोक्यावर घेतलेले माझे अभंग बुडवून यांनी नष्ट केले आणि यापुढे अभंग लिहायला यांनी मला बंदी घातली आहे. अभंग रचायचे नाहीत, कीर्तन करायचं नाही, शूद्रातिशूद्रांना जागं, शहाणं करायचं नाही. मग करायचं काय? हेच तर माझं जीवितकार्य आहे. तेच मला करता येत नसेल तर मग जगून काय उपयोग?
असं सांगतात की पांडुरंगाने तेरा दिवसांनी लहान मुलाच्या रुपात येऊन तुकाराम महाराजांच्या वह्या तुकाराम महाराजांना परत केल्या. रामेश्वर भट तुकाराम महाराजांना शरण आला. त्यानंतरही तुकाराम महाराजांनी पाच दिवस विठ्ठल मंदिरात धरणं धरलं होतं. म्हणजे एकूण अठरा दिवस त्यांनी उपवास केला. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरदार जप्त करायचा हुकूम मागे घेण्यात आला. या प्रकरणात तुकाराम महाराजांची अग्नीपरीक्षाच झाली. त्यात ते तावून, सुलाखून निघाले. त्यांची महती अजूनच वाढली. संत बहिणाई यांनी लिहिलं आहे की चैत्रशुद्ध तृतीयेला वेद तारले. तुकाराम महाराजांच्या गाथेला ‘पंचम वेद’ म्हणतात. म्हणून डॉ. सदानंद मोरे यांनी हाच दिवस ‘गाथा पुनरुत्थान दिन’ असल्याचं मांडलं आहे. हा दिवस सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. म्हणून यादिवशी सर्वांनी देहूला आनंदडोहावर जमावं, तुकाराम महाराजांच्या गाथेचं जाहीर पारायण करावं आणि आनंदोत्सव साजरा करून तुकाराम महाराजांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. यावर्षी हा दिवस सोमवार, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी येतो. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावं. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी “गाथेची मिरवणूक काढून गाथेचं सामुहिक पारायण करावं. असं आवाहन गाथा परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
उल्हास पाटील, अध्यक्ष, गाथा परिवार

