पुष्पगुच्छ झाले कारण ; शिक्षकाकडून शिक्षिकेला शाळेतच जबर मारहाण
मालदाडच्या श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयातील घटना
संगमनेर – प्रतिनिधी दि. 15
शाळेत आणलेल्या पुष्पगुच्छाच्या किरकोळ कारणावरून एका शिक्षिकेला शिक्षकाने टोमणे मारत जबर मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती विद्यालय या शाळेत घडली असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिला शिक्षकेवर अन्याय होत असताना शिक्षकाला धडा शिकवण्या ऐवजी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही माहिती समजली आहे.

याबाबतचे अधिक माहिती अशी की,
संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
या शाळेत नियुक्तीस असलेल्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस असल्याने तिने पतीला देण्यासाठी शाळेमध्ये गुरुवारी पुष्पगुच्छ आणला होता. या पुष्पगुच्छाच्या कारणावरून शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे यांनी शिक्षिकेला टोमणे मारले होते. यासंदर्भात संबंधित शिक्षकाने याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाकडे केली होती.

यानंतर शुक्रवारी सकाळी संबंधित शिक्षकाने सदर शिक्षकेची भेट घेऊन आपला यामागे कोणताही वाईट उद्देश नव्हता असे सांगितले. महिला शिक्षिकेने मला तुमच्याशी बोलायचे नाही असे सांगितल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. या दरम्यान शिक्षकाने या महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर मारहाण करण्यास सुरुवात केली असल्याचे संबंधित फिर्यादी महिलेने म्हटले आहे. त्यानंतर संबंधित महिला शिक्षिकेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दिली. विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर विद्यालयातील मुख्याध्यापक व इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केला.
संगमनेर तालुका पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
