संविधान विरोधी शक्तींचा देशाच्या अखंडतेला धोका — डॉ. अशोक ढवळे 

कॉ. सदाशिव साबळे यांची माकपच्या जिल्हा सचिवपदी निवड

 अकोले प्रतिनिधी दि. 12 

विविध जाती, धर्म, पंथ व प्रांत यांनी मिळून बनलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची रचना अत्यंत विचारपूर्वक व कौशल्याने करण्यात आली आहे. संविधानविरोधी शक्ती मात्र देशवासीयांना त्यांच्या रूढी, परंपरा, धर्म, जाती, प्रांत यांच्यासह सामावून घेणाऱ्या संविधानामध्ये एकांगी बदल करू पाहत आहेत. संविधानविरोधी या शक्ती देशात धर्म, जात व प्रांताच्या आधारे तसेच अस्मितांचा दुरुपयोग करून देशवासीयांमध्ये मतांसाठी फूट पाडत आहेत. या शक्तींचा पाडाव करण्यासाठी व संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता व स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संविधानावर विश्वास असलेल्या सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगर जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने अकोले येथे खुल्या सत्रात ते बोलत होते.

नगर जिल्ह्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन अकोले येथील माकप कार्यालयात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. माकप पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्यासह राज्य सचिवमंडळ सदस्य किसन गुजर, सुनील मालुसरे व डॉ. अजित नवले यावेळी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते ताराचंद विघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या खुल्या सत्रात डॉ. अशोक ढवळे यांनी पक्ष सभासद व सहानुभूतीदारांना संबोधित केले. जनवादी महिला संघटनेच्या नेत्या सुमन विरणक खुल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.

पक्षाचे जिल्हा सचिव सदाशिव साबळे यांनी मागील तीन वर्षाचा अहवाल सभासद प्रतिनिधींच्या समोर मांडला. नामदेव भांगरे, गणेश ताजणे, संगीता साळवे, एकनाथ मेंगाळ, हेमलता शेळके, निर्मला मांगे, रंजना पराड, नंदा म्हसे, अनिता साबळे यांनी जनआघाड्यांचे अहवाल सादर केले. प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी अहवालावर चर्चा करत अहवालाला पाठिंबा दिला.

अकोले, संगमनेर व शिर्डी या शहरांना शिर्डी-शहापूर रेल्वे मार्गाद्वारे व अकोले शहराला नाशिक-अकोले-पुणे रेल्वेमार्गाद्वारे जोडण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.

पुढील तीन वर्षांसाठी राजकीय दिशा कोणती असेल याबाबतही सविस्तर चर्चा करून निर्णय करण्यात आले. पुढील अधिवेशन काळापर्यंत तीन वर्षांसाठी ९ जणांची जिल्हा कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली. सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद विघे, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, मेहबूब सय्यद, प्रकाश साबळे, सुमन विरणक व मथुराबाई बर्डे यांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश आहे. जिल्हा कार्यकारिणीने पुढील तीन वर्षासाठी कॉ. सदाशिव साबळे यांची जिल्हा सचिव म्हणून पुन्हा निवड केली.

पक्षाला मध्यवर्ती प्रवाहात आणून धर्मांध व जातीय शक्तींच्या विरोधात तसेच कॉर्पोरेट व भांडवलदारी शक्तींच्या शोषणाविरोधात सर्वांगाने संघर्ष करण्यासाठी पक्ष मजबूत करण्याची प्रतिबद्धता यावेळी कॉ. सदाशिव साबळे यांनी व्यक्त केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!