संगमनेमध्ये वाळू तस्करांचा हैदोस

तहसीलदारांना मर्डर करुन घरच्यांवर रेप करण्याची दिली धमकी 

तलाठ्यासह महसूलच्या पथकावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी संगमनेर दि. 11

राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री असताना महाराष्ट्र बरोबर नगर जिल्ह्यातील वाळू धोरणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला होता. विशेषतः संगमनेर तालुक्यात आणि विखे पाटील यांच्या मतदारसंघात तर राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू माफियांनी गोंधळ घातला होता. विखे यांच्या मतदारसंघातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या गावातील वाळू तस्करांनी आता पुन्हा तस्करीचा कळस करीत हैदोस घातला आहे. वाळू तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पथकासह यांच्यासोबत गस्तीवर असणाऱ्या तहसीलदारांनाही थेट मोबाईल वरून धमकी देण्यात आली असून पथकातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या अंगावर जेसीबी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. राज्य सरकार आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र बघ्याची भूमिका घेत चुप्पी साधली असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांपासून कायद्याची भीती नसलेल्या वाळूतस्करांचे धाडस वाढले आहे. तत्कालीन महसूलमंत्र्यांचे सातत्याने फसलेले वाळू धोरण महसूल विभागाच्या जीवावर बेतले आहे. गेल्या काही वर्षातील एकही महसूल मंत्री अथवा महसूल प्रशासन या वाळू तस्करांचा माज उतरवू शकलेले नाही. या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तब्बल दहा वाळू तस्करांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

विशाल आबाजी खेमनर, प्रवीण शिवाजी गवारी सोनू मोरे, सावळेराम लहानु खेमनर, तुषार हौशीराम खेमनर, विशाल हौशीराम खेमनर, सागर जगताप, लखन उर्फ दीपक मदने, फिरोज शेख, ताहीर शेख.

या संदर्भात तलाठी संतोष बाबासाहेब शेलार (राहणार इंदिरानगर तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादी त्यांनी म्हटले आहे की, शेलार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाळू तस्करी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकासह संतोष शेलार हे शासकीय वाहन बोलेरो गाडी मधून संगमनेर तालुक्यात कारवाई करण्यासाठी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीच्या पात्रात (देव नदीच्या) ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या जेसीबीच्या सहाय्याने प्रवरा नदी पात्रातून वाळूचे उत्खनन करून त्याचे साठे करण्याचे काम सुरू होते. व त्या ठिकाणी दोन व्यक्ती उभ्या होत्या. त्यांचे नाव विचारले असता सदर व्यक्ती ह्या विशाल आबाजी खेमनर आणि प्रवीण शिवाजी गवारे (दोघे राहणार अंभोरे, तालुका संगमनेर) असे असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल पथक हे जेसीबी जवळ गेले असता त्या ठिकाणी मोटरसायकलवर असलेला एक इसम पथकाला पाहताच अंधाराचा फायदा घेत जेसीबी जवळ गेला व त्याने तो जेसीबी चालू करून पिंपरणे मार्गे अंभोरे गावाच्या रस्त्याने पळवून नेला. शेलार यांच्या पथकाने त्यांच्या वाहनासह जेसीबीचा पाठलाग सुरू केला. यावेळी त्यांच्यासमवेत वाहनात तहसीलदार धीरज मांजरे हे देखील होते. त्याच दरम्यान तीन ते चार मोटार सायकल वर बसलेले काही युवक आणि एका लाल रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या अल्टो गाडीमधून पाठीमागून आले. पथकाने अंभोरे गावा जवळील पुलापासून थोड्या अंतरावर जेसीबीच्या पुढे गाडी आडवी करून अडविण्यात आले. त्याचवेळी अचानक जेसीबी चालकाने या सर्व पथकाला ठार मारण्यासाठी गाडीवर आणि पथकाच्या अंगावर जेसीबी घातला. लाल अल्टो गाडी मधील व मोटरसायकल वरील सहा ते सात युवक या पथकाला अडवून कारवाई करण्यास रोखत होते.

तुम्ही जर शासकीय कारवाई चालू ठेवली तर आम्ही तुमचे हातपाय तोडून व तुम्हाला येथून जिवंत जाऊ देणार नाही. मारून टाकू असा दम जमलेल्या त्या टोळीने पथकाला दिला. तसेच ताब्यात घेतलेल्या जेसीबी वरील ड्रायव्हर व टोळीने पुन्हा पथकाने जेसीबी ताब्यात घेतलेला जेसीबी जेसीबी घेऊन पळून गेले.

या सर्व घडामोडीत सदर वाहनांमध्ये स्वतः तहसीलदार उपस्थित होते. त्यांच्या समोर ही घटना घडली. त्यानंतर ताब्यात असलेल्या दोघा वाळू तस्करांना घेऊन पथक संगमनेर कडे येत असताना त्यातील एका इसमाच्या फोनवर विशाल हौशीराम खेमनर याने फोन करून पथकासोबत असलेले तहसीलदार धीरज मांजरे यांच्या सोबत बोलायचे असल्याचे सांगून तहसीलदार यांच्याशी फोनवरून बोलताना त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जे कोणी कारवाई करायला आले आहेत त्या सर्वांचे मर्डर करून टाकण्यात येतील व तुमच्या घरामध्ये घुसून घरच्यांवर रेप करण्यात येईल अशी धमकी देऊन शिवीगाळ करीत आमच्या लोकांवर कारवाई केल्यास तुम्हाला कापून टाकू अशी धमकी दिली. अशी फिर्याद शेलार यांनी दिली असून संगमनेर तालुका पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!