पठार भागात पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार !
शेती औषधांचे ६ लाख रुपयांचे बॉक्स पळवले
तोंडावर रुमाल : ट्रक चालक बेशुद्ध
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रस्त्यावरचे लुटमारीचे प्रकार अद्यापही बंद झालेले नाहीत. इतर गुन्हे घडत असताना, घरफोड्या होत असताना आता रस्त्यावर लुटमार सुरू झाली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत शेतीसाठी असलेल्या औषधांचे ५ लाख १२ हजार २१४ रुपयांचे 181 बॉक्स आणि बॅग्स ट्रक मधून पळविण्यात आले आहेत.

पठार भागातील माहुली घाटामध्ये ही घटना घडली असून ट्रक चालकाच्या तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध करून पिस्तूलचा वापर करीत लुटमार करण्याचा हा प्रकार झाला. पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे या प्रकरणामुळे उघड होत आहे आहे.

याबाबतची माहिती अशी की, सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचा शेती औषधांचा माल घेऊन फुरसुंगी, पुणे येथून लेलँड कंपनीचा ट्रक एमएच ४२ ए क्यू 80 78 हा नाशिककडे चालला होता. चाळकवाडीच्या पुढे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन तरुण अज्ञात इसम हात दाखवून गाडीमध्ये बसले. या दोन अज्ञात इसमांचे नाव पत्ता सदर ट्रक चालकाला माहित नाही.

त्या दोघांनी संगमनेरला जायचे आहे असे सांगितले होते. त्यानंतर हे सर्व त्या ट्रक मधून संगमनेरकडे निघाले असता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास माहुली घाटामध्ये त्यातील एकाने बाथरूमला जायचे असल्याचे सांगून गाडी थांबवली व तो खाली उतरला. त्यानंतर गाडीत बसलेल्या दुसऱ्याने चालकाच्या कमरेला पिस्तूल लावले व खाली उतरलेल्या इसमाने दरवाजाच्या बाजूने येऊन पांढऱ्या रंगाचा रुमाल नाकाला लावल्यानंतर चालक बेशुद्ध पडला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदर ट्रक चालक शुद्धीवर आल्यानंतर त्या ट्रक मधील शेतीमालाचे औषध बॅग्स, बॉक्स गायब झालेले त्यास आढळून आले. या ट्रक मध्ये सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे शेतीमालाचे औषधाचे 5 लाख 72 हजार 214 रुपयांचे 181 बॉक्स होते.

या संदर्भात ट्रकचालक दीपक किसन कदम (वय 42 वर्ष, राहणार राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद्री दिली असून पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
