उत्कर्षा रूपवतेंच्या वाहनावर दगडफेक करणारे आरोपी अद्यापही निष्पन्न झाले नाहीत…
अकोले दि. 2 प्रतिनिधी —
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या अकोले तालुक्यातील राजूर परिसरात प्रचार संपवून अकोले कडे येत असताना रात्री उशिरा त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात येऊन गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या संदर्भात त्यांनी राजुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून ते आज पर्यंत सदर गुन्हतील आरोपी पकडणे तर सोडा साधे निष्पन्नही झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने चालू आहे हे उघड झाले आहे. रुपवते यांनी फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणाचा फॉलोअप घेणे दखील सोडले असल्याने तपासातील प्रगती आणि त्यातील गांभीर्य नाहीसे झाले असल्याची बोलले जात आहे.

मे 2024 मध्ये प्रचाराचे कामकाज आटोपून उत्कर्षा रुपवते या राजुर होऊन चितळवेढे मार्गे अकोले कडे जात असताना चितळवेढे शिवारात गावच्या पाठीमागे रस्त्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रुपवते यांच्या गाडीवर दगड फेकून मारण्यात आले. त्यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या व गाडीचे नुकसान झाले. मोटार सायकल वरून आलेल्या दोघाजणांनी (अंदाजे वय 30 ते 35 वर्षे) ही दगडफेक केली असून अंधाराचा फायदा घेऊन दोघे पसार झाले होते.

त्यावेळी या घटनेने वृत्तपत्रातून चांगलीच खळबळ उडाली होती. मे 2024 मध्ये घटना घडल्यानंतर आज फेब्रुवारी 2025 साल चालू आहे. सुमारे दहा महिने होत आले तरीही पोलिसांना अद्याप आरोपी सापडणे तर सोडा आरोपी निष्पन्न देखील झाले नाहीत अशी अवस्था सध्या या प्रकरणाची आहे.
