गो शाळेचा मॅनेजर व बजरंग दलाच्या तिघांवर गुन्हा दाखल !
संगमनेर दि. 31 प्रतिनिधी –
गो शाळेच्या मॅनेजरने बजरंग दलाच्या तिघांच्या मदतीने जनावरांची चौकशी करण्यासाठी आलेल्या तिघा जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाकडी दांडक्याने तसेच लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकारामुळे रात्री रुग्णालय परिसरात व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती.

अधिक माहिती अशी, फिर्यादी तोहित खलील कुरेशी, त्याचा चुलत भाऊ अरबाज जलील कुरेशी व मित्र फैसल शेख हे तिघेजण गुरुवारी (३० जानेवारी) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सायखिंडी येथे असलेल्या गोशाळेमध्ये गेले होते.
त्यांनी गोशाळेच्या व्यवस्थापकाला नगरपालिकेने येथे जनावरे आणली आहेत का? अशी विचारणा केली. याचा राग आल्याने व्यवस्थापकाने बजरंग दलाच्या तिघाजणांना तेथे बोलावून घेतले. त्यानंतर या तिघांना गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादी तोहीत खलील कुरेशी (रा. मोगलपुरा, खाटीक गल्ली, संगमनेर) याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

शहर पोलिसांनी या संदर्भात गोशाळेचा मॅनेजर (नाव माहित नाही) याच्यासोबत आणखी तिघा अनोळखी इसमावर रात्री गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पुढील तपास करत आहेत.
