खासगी गाडीवर “पोलीस” फलक लावून फिरणाऱ्यांनी पोलिसालाच केली दादागिरी !
दमबाजी, शिवीगाळ, हातपाय तोडण्याची धमकी देऊनही केवळ अदखलपात्र गुन्हा
संगमनेर दि. 28 प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या श्री बाळेश्वर मंदिरातील पोलीस यंत्रणेच्या बिनतारी संदेश व्यवस्थेसाठी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबलला दमदाटी करण्याचा प्रकार झाला असून दमदाटी, शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देणारे हे खासगी गाडीला पोलीस नावाचा फलक लावून आलेले होते.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्री बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे. येथे संरक्षण ड्युटीला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चौघांनी दमबाजी, शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली. यावर कळस म्हणजे घारगाव (ता. संगमनेर) पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या त्या पोलिसाला तक्रार देण्यासाठी तब्बल सहा तास थांबावे लागले. एवढे होऊनही घारगाव पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.

सचिन वैष्णव (गाव माहीत नाही), फॉरेस्ट अधिकारी (गाव, पत्ता माहीत नाही) व इतर दोघे अशा एकूण चार जणांविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर (नेमणूक, पोलिस मुख्यालय, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे. येथे पोलिस हेड कॉन्स्टेबल खेडकर ड्युटीला असताना सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बाहेर आरडाओरड सुरू होती. त्यामुळे त्यांनी बाहेर जावून पाहिले असता मंदिराच्या दरवाजाचे काम करणाऱ्या कामगारांना चौघे दमबाजी करत होते. ‘ते कामगार आहेत, त्यांना बोलू नका’ असे खेडकर त्यांना म्हणाले. व त्यांनी वॉकीटॉकीद्वारे घारगाव पोलिसांची मदत मागितली.

दमबाजी करणाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, ‘मी पण पोलिस आहे. तुम्ही जास्ती हुशारी करू नका, तुमचा खाली येऊन बोलण्याचा काही अधिकार नाही.’ त्यातील दुसऱ्याने ‘मी फॉरेस्ट अधिकारी आहे, या रूम आमच्या आहेत, तुम्ही मंदिरात झोपायचे, तुम्ही येथून चालते व्हा’ असे तो खेडकर यांना म्हणाला. इतर दोघे दमबाजी, शिवीगाळ करून लागले. ते चौघे ज्या चारचाकी वाहनातून आले होते, त्यात ’पोलिस’ नावाची इंग्रजी पाटी होती. त्या कारचा क्रमांक एम. एच. १७, सी. एक्स २३५६ असा आहे.

‘तुम्ही खाली या, खाली कमानी जवळ राहत असून तुमचे हातपाय तोडतो’ अशी धमकी देऊन ते आलेल्या चारचाकी वाहनातून निघून गेले. त्यानंतर घारगाव पोलिस ठाण्यातील सरकारी वाहन घटनास्थळी आले. पोलिसांना घडला प्रकार खेडकर यांनी सांगितला. त्यानंतर ते घारगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.

मी रात्री ड्युटीसाठी मुक्कामी होतो. काही लोक रात्री येऊन ते मंदिराच्या दरवाजाचे काम करणाऱ्या कामगारांच्या खोलीत घुसले, त्यांनी तेथे नशापान केली. घडलेल्या घटनेच्या संदर्भाने सकाळी ९ वाजता घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो असता मला साधारण सहा तास पाेलीस ठाण्यात थांबून रहावे लागले. माझी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षकांना फोन केला. अहिल्यानगर येथे संपर्क करून विनंती केली. त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांनी माझी फिर्याद घेतली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली.
– रघुनाथ खेडकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल
