आढळा कालवे दुरुस्ती कामात मोठा भ्रष्टाचार – जालिंदर वाकचौरे
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे तक्रार अर्ज –
अकोले दि. 23 प्रतिनिधी —
अकोले तालुक्यातील अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 15 गावांना सिंचन करणाऱ्या आढळा धरणावरील कालवे दुरुस्तीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश सदस्य आणि माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी लेखी निवेदनाद्वारे ही तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली आहे.
उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे 3 हजार 914 हेक्टर क्षेत्राचे आढळा धरणातून सिंचन होते. जवळपास 20 किमी पेक्षा अधिक लांबी या दोन्ही कालव्यांची आहे. दोन्ही कालव्यांचे दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सरकारने करोडो रुपये खर्च केले. शासनाच्या या पैशाला पध्दतशीर चुना लावल्याचा प्रकार घडला आहे.
अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने दाखविलेली कामे झाली नाहीत. जी कामे करण्यात आली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली. अनेक ठिकाणी कालव्यांची दुरुस्ती न करता परस्पर ही कामे कागदावरच दिसतात. काम झाले नाही पैसे मात्र पदरात पाडून घेतले. वरिष्ठ अधिकारी देखील याबाबत उडवाउडवीची उत्तरे देतात.
आढळे वरील झालेल्या कालवा दुरुस्ती कामांची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या रब्बी हंगामाचे आवर्तन सुरु आहे.कालव्यांची योग्य दुरुस्ती झाली असती, पाणी योग्य मिळाले असते तर शेतकऱ्यांनी पाणीमागणी केली असती. परंतु कालवे दुरुस्ती होऊनही पुर्ण दाबाने पाणी मिळणार नाही याची शाश्वती शेतक-यांना असल्याने त्याचा पाणीमागणी अर्जावर मोठा परिणाम झाल्याचे निदर्शनास येईल. शेतकरी पाणी मागणी का करीत नाहीत याचे खरे उत्तर या कालवा दुरुस्तीत दडले आहे. कालव्यांची योग्य दुरुस्ती झाली असती तर आपल्याला पाणी नक्की मिळेल याची शाश्वती शेतकऱ्यांना आली असती. मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांकडे तक्रार दाखल केली असून लवकरच माहितीच्या अधिकारात आपण ही माहिती घेऊन शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत.
जालिंदर वाकचौरे
प्रदेश सदस्य,भाजपा महाराष्ट्र राज्य
——————————————-