‘त्या’ गुन्हेगार कुत्र्याच्या तपासात संगमनेरचे पोलीस….

संगमनेर दि. 21

विशेष प्रतिनिधी —

पोलीस ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. यात आरोपींमध्ये पुरुष, महिला, मुला-मुलींचा समावेश असतो. किंवा अज्ञात व्यक्ती विरुद्धच गुन्हा दाखल केला जातो.

मात्र गेल्या आठवड्यात अजब – गजब प्रकार घडला असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या परदेशी वाण असलेल्या कुत्र्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चक्क पुढील तपास करत आहेत.

गेल्या बुधवारी घडलेल्या या प्रकारासंदर्भात रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्या विरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. आरोपीमध्ये प्रथमत:च एका (प्राण्याचा) पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलीस याप्रकरणी नेमका काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेर शहरालगत घुलेवाडी शिवारात असलेल्या एका मळ्याच्या परिसरात गेल्या बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात रविवारी पोलिसांनी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका महिलेने दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी महिला ही शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारात कुटुंबासह राहावयास आहे. तिथेच डॉ. पानसरे हे राहावयास असून त्यांच्याकडे रॉट विलर जातीचा पाळीव कुत्रा आहे.

हा कुत्रा फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरातील नागरिकांच्या अंगावर गेला असून त्यात ते जखमी झाले आहे. बुधवारी देखील (१५ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्याकडील दुचाकीवरून मुलीला शाळेतून घेऊन घरी येत असताना घराजवळ असलेल्या डॉ. पानसरे यांच्याकडील पाळीव कुत्रा गेटमधून फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून आला.

 

त्यामुळे फिर्यादी महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात फिर्यादी महिलेला मार लागून ती जखमी झाली. सदरचा अपघात हा डॉक्टर पानसरे यांचा कुत्रा अंगावर आल्याने झाला असल्याचे म्हटले आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात डॉक्टर पानसरे यांच्या पाळीव कुत्र्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २९१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गजानन वाळके करत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!