संगमनेरात हॉटेल फोडले !
1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
संगमनेर दि. 18
संगमनेर शहरात घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांची नजर आता हॉटेल, बियर बार परमिट रूम कडे वळली असून संगमनेर शहर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या गुंजाळवाडी शिवारात संस्कृती हॉटेल या ठिकाणी घरफोडीची घटना घडली आहे. सदर हॉटेल फोडून चोरट्यांनी दारूच्या बाटल्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंजाळवाडी शिवारामधे संस्कृती हॉटेल असून हे हॉटेल नेहमीप्रमाणे रात्री व्यवहार संपल्यानंतर अकरा वाजेच्या दरम्यान बंद करून कामगार आणि मॅनेजर घरी गेले. संबंधित मॅनेजर हे घुलेवाडी या ठिकाणी राहतात. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलचे कॅशियर यांनी त्यांना फोन करून सांगितले की हॉटेलचे शटर उचकटलेले दिसत असून हॉटेलमध्ये लवकर या.

त्यानुसार कर्मचारी आणि मॅनेजर यांनी हॉटेलची पाहणी केली असता हॉटेलचे शटर मधूनच उचकटलेले दिसून आले. तसेच हॉटेलच्या मागील दरवाजाने आत मध्ये जाऊन पाहणी केली असता हॉटेल काउंटरच्या वरील बाजूस लावलेल्या विदेशी दारूच्या बाटल्या लंपास करण्यात आलेल्या दिसून आल्या. तसेच काउंटरच्या ड्रॉवर मधील रोख रक्कमही चोरून नेल्याचे आढळून आले.

13 हजार 330 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि 1 लाख 40 हजार रुपये अशी रोख रक्कम मिळून 1 लाख 53 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. या संदर्भात हॉटेलचे मॅनेजर सुबोध जयराम शेट्टी (वय 43, हॉटेल मॅनेजर, राहणार घुलेवाडी, तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

