महा कुंभमेळा ; विमान प्रवास महागला

मुंबई ते प्रयागराज ६,३८१ तर भोपाळ ते प्रयागराज सर्वात महाग १७ हजार ७९६ रुपये…एका तिकिटासाठी मोजावे लागणार…

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – दि. 16

प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून, विमान तिकिटांचे दरही वाढले आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली असून, देशासह जगभरातील भाविकांची गर्दी प्रयागराजकडे वाढू लागली आहे. अशात विमान तिकिटांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रयागराजला जाण्यासाठी अनेक भाविक विमान प्रवासाला पसंती देत असल्याने विमान तिकिटांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.

वेळेची बचत होत असल्याने प्रयागराजला जाणाऱ्या भक्त प्रवाशांकडून विमानांच्या प्रवासात मोठी वाढ झाली आहे. एका ट्रॅव्हल पोर्टल च्या माहितीनुसार, दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या तिकीट दरात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील एकेरी भाडे आता वाढले आहे. मुंबई ते प्रयागराज विमानांच्या तिकीट दरांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील विमान भाडे आता सरासरी ६ हजार ३८१ रुपये झाले आहे.

दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ ते प्रयागराज मार्गावरील विमानांच्या भाड्यात सर्वाधिक ४९८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भोपाळहून प्रयागराजला जाण्यासाठी २ हजार ९७७ रुपये इतके विमान भाडे लागत होते. ते आता १७ हजार ७९६ रुपये इतके झाले आहे. बेंगळुरू ते प्रयागराज आणि अहमदाबाद ते प्रयागराज यासारख्या इतर मार्गांवरही अनुक्रमे ८९ टक्के आणि ४१ टक्के भाडेवाढ झाली आहे.

प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, लखनौ आणि वाराणसीसारख्या जवळच्या शहरांतून प्रयागराजला जाणाऱ्या विमानांची तिकिटेही अनुक्रमे ४२ टक्के आणि १२७ टक्क्यांनी वाढली आहेत. यावरून महाकुंभमेळ्याकडे भाविक मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचे दिसते.

यंदाचा महाकुंभ मेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ असा तब्बल ४४ दिवस चालणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभमेळा जिल्हा असा नवा जिल्हा निर्माण केला आहे. सुमारे ६ हेक्टर (१४.८२६ एकर) परिसरामध्ये या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली असून, त्यातील ४ हजार हेक्टरमध्ये प्रत्यक्ष महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर १ हजार ९०० हेक्टर (४ हजार ६९५ एकर) परिसरामध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!