संगमनेरात नायलॉन मांजाचे रील पकडले
संगमनेर दि. 14
संक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्राण घातक ठरू शकणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत सुमारे साडेसात हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला.

नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास इजा होण्याची शक्यता असल्याने याची जाणीव असताना देखील संगमनेरमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, महिला पोलीस कॉन्स्टेबल ताई शिंदे यांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले.

पथकाने बाजारपेठेतील गृह वस्तू भंडाराजवळील तेली खुंट परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तेथे जहीर रऊफ अत्तार हा नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे पथकाला आढळून आला. पोलिसांनी त्याच्या दुकानाची झडती घेतली असता तेथे त्यांना नायलॉन मांजाचे ११ रिल आढळून आले.

या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जहीर रऊफ अत्तार याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३, १२५ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
