विद्यार्थिनींचा पाठलाग करीत विनयभंग करणाऱ्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर दि. 7 

खाजगी क्लास संपवून बस स्टॅन्ड कडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढत विनयभंग व लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश राजेंद्र वाडेकर (रा. चास पिंपळदरी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, पीडित फिर्यादी तरुणी दररोज तालुक्यातील एका गावाहून संगमनेरला एसटी बसने आपल्या मैत्रिणीसह ये-जा करते. सोमवारी दुपारी ती संगमनेरमध्ये आली होती. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास क्लास संपवून ती मैत्रिणीसह गावाकडे जाण्यासाठी एसटी बस स्टैंड वर जात असताना नवरत्न चहा सेंटर समोर उभ्या होत्या. त्यावेळी चहाच्या दुकानातील एक इसम त्यांच्याकडे पाहून हाताने इशारा करत होता.

त्यामुळे घाबरलेल्या मैत्रिणी तेथून बाजूला जात असताना सदर व्यक्तीने पाठीमागून येऊन फिर्यादी मुलीचा हात पकडला. घाबरलेल्या फिर्यादीने हात सोडून तिने व तिच्या मैत्रिणीने आपल्या नातेवाईकांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाल्याने गर्दीतील काहीजणांनी आरोपीला पकडून ठेवले होते.

गर्दीतील कोणीतरी पोलिसांना माहिती देत बोलावून घेतल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पकडून ठेवलेल्या व्यक्तीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर व्यक्तीचे नाव आदेश राजेंद्र वाडेकर (रा. चास पिंपळदरी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे असल्याची माहिती समोर आली.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी आदेश वाडेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७९ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाअंतर्गत कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!