थोरात कृषी महाविद्यालयामध्ये आळंबी उत्पादन व मधुमक्खी पालन कार्यशाळा संपन्न
संगमनेर दि. 9
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात कृषी पूरक व्यवसायाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती व्हावी याकरता आळंबी उत्पादन तंत्रज्ञान व मधुमक्खी पालन याविषयी कार्यशाळा संपन्न झाली यावेळी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती सर्वाधिक फायदेशीर ठरेल असा विश्वास संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आळंबी उत्पादन व मधमाशी पालन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी गोदावरी फार्मचे संचालक ऋषिकेश औताडे, संस्थेच्या विश्वस्त शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर ऑफ अकॅडमी डॉ. जे बी गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एस वाघ, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक जी.बी बाचकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना औताडे म्हणाले की, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कृषी महाविद्यालयाने कृषी शिक्षणाबरोबर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. शेतीला पूरक व्यवसाय केल्याने तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. नव्याने आळंबी उत्पादन व मधुमक्खी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे .याला शासकीय अनुदानही असून योग्य पद्धतीने हा व्यवसाय केल्यास नक्कीच मोठा व्यवसाय ठरू शकतो. यावेळी त्यांनी धिंगरी आळंबी कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळून देते असे सांगताना धींगरी आळंबी मध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे धीगरी आळंबीची लागवड किफायतिशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर मधुमाशीच्या विविध जाती मधापासून बनणारे विविध पदार्थ याबाबतही त्यांनी माहिती दिली. तर शरयूताई देशमुख म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यात, डाळिंब उत्पादनासह दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय हा मोठा जोड व्यवसाय झाला आहे. आता नव्याने आळंबी उत्पादन यामध्येही अनेक शेतकरी आले आहेत मधुमक्खी पालनातून तरुणांसाठी व्यवसायाची संधी आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ यांनी केले तर समन्वयक डॉ. गीतांजली जेजुरकर यांनी आभार मानले.
