संगमनेर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ योजनेसाठी निवड !….

आमदार अमोल खताळ यांच्या पाठ पुराव्याला यश

संगमनेर / प्रतिनिधी —

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत आणि भौतिक सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने आमदार अमोल खताळ यांनी राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठ पुरावा केला होता. या प्रयत्नांना अखेर यश आले असून राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करणे” या महत्त्वाकांक्षी योजनेतर्गत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी आणि तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषदांच्या शाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्या अनुषंगाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी २७ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला.या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ४७८ शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी व तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश झाला आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये आधुनिक वर्गखोल्या, स्वच्छता सुविधा, डिजिटल शिक्षण साधने, क्रीडांगणे तसेच इतर आवश्यक भौतिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा मिळाव्यात, हा आमचा ठाम उद्देश आहे. जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. चंदनापुरी आणि तळेगाव दिघे येथील शाळांची निवड ही त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील काळात संगमनेर तालुक्यातील आणखी शाळांचा या योजनेत समावेश व्हावा यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत, जेणेकरून प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्याला सक्षम आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळू शकेल,” आमदार अमोल खताळ, संगमनेर 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!