संगमनेर तालुक्यासाठी महसूल मंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला
मात्र त्याचा उपयोग सुयोग्य व्हावा..
सर्व कामांचा दर्जा चांगला असावा…
जनतेची अपेक्षा

प्रतिनिधि —
संगमनेर तालुक्यासाठी मंजूर केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून त्याचा सुयोग्य वापर व्हावा आणि त्यातून होणाऱ्या विविध विकास कामांचा दर्जा अतिशय उत्कृष्ट असावा अशी साधारण अपेक्षा संगमनेर तालुक्यातील जनतेमधून व्यक्त होत आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तशा आशयाच्या बातम्या थोरात यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जरी हा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी त्याचा वापर त्याच कामासाठी झाला आहे काय ? ते काम सुरू झाले आहे काय ? याचा शोध घेणे गरजेचे आहे.
तसेच एकूण किती कोटी रुपयांचा निधी संगमनेर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. (आकडा अब्जावधी रुपयां मध्ये जाऊ शकतो. ) आणि त्यापैकी किती कोटी रुपये प्रत्यक्ष मिळाले आहेत. याचीदेखील माहिती मिळणे आवश्यक आहे.
किती कोटी रुपयांचा वापर विकासकामांसाठी झाला आहे याची स्पष्ट आकडेवारी मात्र उपलब्ध होत नाही.

संगमनेर तालुक्याचा आणि शहराचा विकास करायचा असेल तर या विकास कामांमध्ये पारदर्शकता असायला हवी असे संगमनेरकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात आणि शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. मात्र या विकास कामांचे ठेकेदार कोण आणि कोणाला कोणते काम मिळाले आहे याबाबत गुप्तता पाळली जाते. अनेक वेळा काही नागरिकांनी माहितीचा अधिकार वापरुन देखील ठेकेदारांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना पण माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात आली. उत्तरे मिळाली नाहीत.
आपले काम जर चांगले असेल आणि प्रामाणिक असेल तर गुप्तता पाळण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.
आपले काम जर सरळ आणि स्वच्छ आहे तर लपवा छपवी कशासाठी ? अशा प्रतिक्रिया नागरिक देतात.

सर्व सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जात नाही. तसेच या कामावर देखरेख करणाऱ्या शासकीय संस्था देखील कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत ज्या शासकीय विभागाची ही जबाबदारी आहे ती जबाबदारी देखील हे विभाग व्यवस्थितरीत्या पार पाडताना दिसत नाहीत.
त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवला असला तरी त्याचा वापर सुयोग्य आणि चांगल्या कामांसाठी व्हायला हवा अशी अपेक्षा रास्त आहे.

यापूर्वीदेखील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगरपालिकेच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना सर्वांना चांगल्या कानपिचक्या दिल्या होत्या.
करण्यात येणारी विकासकामे ही उच्च दर्जाची असावीत. ठेकेदार कोणीही असो नागरिक आपल्याला नावे ठेवतात. त्यामुळे रस्तेच काय सर्वच कामे उच्च दर्जाचे असावेत असे थोरात यांनी बजावले होते. त्याचा विसर बहुतेक ठेकेदारांना पडलेला आहे.
संगमनेर तालुक्यातील कामाच्या दर्जाचे ऑडिट होणे देखील आवश्यक असल्याचे जनतेमधून बोलले जाते. या सर्व बाबींकडे सकारात्मक दृष्टीने पाहून संगमनेरच्या विकासासाठीच असल्याने त्या टीकात्मक म्हणून न घेता सत्ताधार्यांनी या सर्व बाबींची काळजी घ्यावी आणि विकासाला चालना द्यावी असेच मत सर्वत्र व्यक्त होत आहे.
