संगमनेर तालुक्यातील फळबागांसाठी साडेचार कोटींचा पीक विमा मंजूर

प्रतिनिधी —
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सातत्याने निधी मिळाला असून नुकताच फळबागांसाठी साडेचार कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे व तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटानंतर बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या माध्यमातून सातत्याने तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे. याचबरोबर निळवंडेच्या कालव्यांसाठी ही २०२ कोटींचा अतिरिक्त निधी मिळाला असून कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहे .
मिळालेल्या निधीमधून पाझर तलावांची दुरुस्ती, रस्त्यांची कामे, शहरातील रस्त्यांचे चौपदरीकरण, पानंद रस्ते, यांसह अनेक विकास कामांचा समावेश आहे.

नुकताच केंद्रसरकारच्या वादळ, वारा, पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे फळबागांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण व्हावे यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळबाग योजनेअंतर्गत मृग बहार २०२१ मधून संगमनेर तालुक्यातील ४ हजार ३६२ शेतकऱ्यांना ४ कोटी ५९ लाख ३५ हजार २०० रुपये रकमेचा विमा मिळाला आहे.
यामधून आश्वी बुद्रुक, धांदरफळ, डोळासणे, घारगाव, पिंपरणे, साकुर, संगमनेर बुद्रुक, शिबलापुर, समनापुर, तळेगाव या सर्कलमधून डाळिंब साठी तर शिबलापुर मध्ये लिंबु या पिकासाठी आणि घारगाव येथे सीताफळ या पिकांसाठी हा पिक विमा मंजूर झाला आहे.

येत्या महिन्याभरात पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा होणार आहेत.
मागील वर्षी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून पाठपुरावा करून विविध शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळाला होता. या वेळेसही संगमनेर तालुका कृषी विभाग व सर्व कृषी विभागातील अधिकारी, कृषी सेवक यांच्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांच्या फळबागांची नोंद करून त्यांना हा मोठा निधी मिळाला आहे.
याकामी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले असून हा मोठा निधी मिळाल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांमधून बाळासाहेब थोरात व कृषी विभागाचे अभिनंदन होत आहे.
