संगमनेर तालुक्यातील ९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर !

प्रतिनिधी —
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात विविध विकास कामांची घोडदौड कायम आहे. याच बरोबर जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील नऊ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे १२ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा परिषद गटनेते अजय फटांगरे व इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना फटांगरे म्हणाले की, कोरोनाच्या संकटानंतर नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र सरकार मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. यामधून सातत्याने वाडी-वस्तीवर विकासाचे कामे सुरू आहेत. याच बरोबर जिल्हापरिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत विविध जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे ११ कोटी ९९ लाख १७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

या अंतर्गत तळेगाव जि.प. गटाचे सदस्य महेंद्र गोडगे यांच्या पाठपुराव्यातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ९२ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. तर बोटा गटाचे जि. प. सदस्य अजय फटांगरे यांच्या पाठपुराव्यातून कुरकुंडी पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ४३ लाख ३५ हजार, म्हसवंडी पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी १ लाख ७३ हजार रु. भोजदरी पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ३८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

साकुर गटाच्या जि.प.सदस्य व महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे यांच्या पाठपुराव्यातून जांबूत बु पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ३९ लाख ६५ हजार रुपये तर पिंपळगाव देपा पाणी पुरवठा योजनेसाठी ९२ लाख ४४ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. निमोण गटाचे जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या पाठपुराव्यातून पारेगाव खुर्द पाणीपुरवठा योजनेसाठी ८७ लाख ७१ हजार रुपये तर जोरवे गटाच्या जि.प सदस्य शांताबाई खैरे यांच्या पाठपुराव्याने वाघापूर पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ३ लाख ८५ हजार रुपये व पिंपरणे पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ९९ लाख २४ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

या योजनांच्या पाठपुरावा कामी आमदार डॉ. सुधीर तांबे, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. पारेगाव खुर्द, वाघापूर, जांबूत बु., पिंपरणे, कुरकुंडी, म्हसवंडी, पिंपळगाव देपा, भोजदरी ,तळेगाव दिघे यामुळे या गावांमधील नागरिक व महिला भगिनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
