कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७ ट्रॅक्टर सह शेती अवजारांचे वाटप !
कृषी व्यवसायाला यांत्रिकीकरणाची जोड गरजेची – महसूल मंत्री थोरात
प्रतिनिधी —

कृषी व्यवसायाला यांत्रिकीकरणाची जोड दिली तर हा व्यवसाय नक्कीच लाभदायी ठरतो असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पात्र शेतकऱ्यांना ७ ट्रॅक्टर व ४ गवत काढणी यंत्रांचे वितरण करण्यात आले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जयहिंद लोकचळवळीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी शेती साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जि. प. सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, सोमनाथ गोडसे, प्रकल्प प्रमुख डॉ. अभयसिंह जोंधळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कारभारी नवले, तहसीलदार अमोल निकम आदींसह विविध नागरिक अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील ७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ४ गवत काढणी यंत्राचे वितरण करण्यात आले.
थोरात म्हणाले की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीमध्ये आधुनिकता आणणे गरजेचे आहे. व्यापारी पद्धतीने शेती केल्यास ती फायदेशीर ठरू शकते. याचबरोबर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केला पाहिजे. त्यामुळे कमी कष्टात व कमी वेळेत जास्त उत्पादन घेता येईल.

शेती व्यवसायात महिला भगिनींचा ही सातत्याने मोठा वाटा राहिला आहे. त्यांनाही आधुनिक प्रणालींची माहिती झाल्यास नक्कीच या व्यवसायाला व त्या कुटुंबाला फायदा होईल. शेती संशोधनात मोठा वाव असून तरुणांनी आधुनिक शेती बरोबर उद्योग व्यवसायाला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले
आमदार डॉ तांबे म्हणाले की, जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहित केले जात आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करून नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये कृषी विभागाचा ही मोठा सहभाग राहिला आहे. पारंपारिक शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून यांत्रिकीकरणाने शेती केल्यास शेती व्यवसाय नक्कीच फायद्याचे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे यांनी केले. सूत्रसंचालन अभय जोंधळे यांनी केले तर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी आभार मानले.
यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांसह विविध प्रगतशील शेतकरी व महिला भगिनी उपस्थित होत्या.
