संगमनेर कृषी उपविभागातून ३५ शेतकरी महिला शेती प्रशिक्षण सहली साठी रवाना !
महिला शेतकरी सन्मान योजना !

प्रतिनिधी —
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संगमनेर कृषी विभागातून ३५ शेतकरी महिला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कृषी प्रशिक्षण सहलीसाठी रवाना झाल्या आहेत. मनुष्यबळ विकास कार्यक्रमा अंतर्गत संगमनेरच्या कृषी विभागाने हा प्रकल्प राबविला आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण (प्रत्यक्ष शेतीत जाऊन प्रशिक्षण देणे) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेती, शेती पुरक व्यवसायाचे कृषी शैक्षणिक संस्था व प्रगतशील शेतकरी यांच्या शेतावर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सदर कार्यक्रमा अंतर्गत कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण घटकांची माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. शासनाने २०२२ हे वर्ष ‘महिला शेतकरी सन्मान वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे. कृषी क्षेत्रातील कल्पक प्रयोगांची माहिती महिला शेतकऱ्यांना होण्यासाठी संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील १०, अकोले तालुक्यातील ७, कोपरगाव तालुक्यातील १०, राहाता तालुक्यातील ८ अशा एकूण ३५ महिला शेतकऱ्यांची शेती प्रशिक्षण भेटी च्या सहलीसाठी निवड करण्यात आली होती. सदरचा कार्यक्रम हा पाच दिवसांचा असून २० फेब्रुवारी पासून ते २४ फेब्रुवारी पर्यंत च्या कालावधीत बारामती, सासवड, पाडेगाव, महाबळेश्वर, दापोली या ठिकाणी सहलीचे आयोजन करून प्रक्षेत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या शिक्षणामध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामती या प्रक्षेत्रावर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबबत महिलांना माहिती देण्यात येईल. ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे उसाच्या विविध जाती व ऊस शेतीचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन होणार आहे. सासवड, पुरंदर येथे सिताफळ संशोधन केंद्रास भेट देऊन तेथील सिताफळ लागवड करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीवर भेट देऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच महाबळेश्वर येथे गहू संशोधन केंद्र, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र, स्ट्रॉबेरी उत्पादन शेतकरी प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन घेतले जाणार आहे. कृषी विद्यापीठ दापोली येथे प्रक्षेत्रावरील विविध उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. तसेच काजू लागवड, काळीमरी लागवड व आंबा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले जाणार आहे.

या प्रक्षेत्र प्रशिक्षणातून शेती करणाऱ्या महिलांना नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळवून त्यांच्या ज्ञानात व अनुभव नक्कीच भर पडणार आहे असा विश्वास उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर उपविभागातून एकूण ३५ शेतकरी महिलांची यासाठी निवड झाली आहे. व त्या रवाना देखील झाल्या आहेत.

यामध्ये संगमनेर तालुक्यातील नंदिनी वाणी, सौदामिनी कान्होरे, सुनिता कांदळकर, मिना इल्हे, अर्चना वनपत्रे, बेबी थोरात, अर्चना बालोडे, पद्मा थोरात, नीता पवार, निशा कोकणे यांची निवड झाली आहे तर अकोले तालुक्यातून बेबी शेटे, योगिता पाटोळे, माया हासे, कालिंदी हासे, सुगंधाबाई हासे, भारती वाकचौरे, सीमा वाकचौरे यांची निवड झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातून मीना जाधव, अश्विनी टुपके, कुसुम मैंदड, गंगुबाई डुकरे, चित्रा जाधव, नंदा शिंदे, नर्मदाबाई कदम, लता भगत, नंदा क्षीरसागर, सविता टुपके यांची निवड झाली आहे.

तर राहता तालुक्यातून नीता कांदळकर, प्रिया कडू, अनिता घोगरे, सुनिता लांडे, पुंजा तांबे, मंगल गाडगे, उषा डेंगळे, अनिता ब्राह्मणे यांची निवड झाली आहे.
या सर्व शेतकरी महिला दिनांक २० फेब्रुवारी रोजी शेती प्रशिक्षण सहलीसाठी रवाना झाल्या आहेत.

उशिरा का होईना महिला शेतकरींना स्वतंत्र पणे अभ्यास करण्यासाठी दापोली येथे अभ्यासासाठी पाठवलं आहे. माझे सर्वात थोरले काका कै. दामोदर रामभाऊ जोर्वेकर हे स्वामी खर्चाने सिमला येथे बटाटा संशोधन केंद्रात जाऊन बटाटा लागवड कशी करावी याचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी संगमनेरला त्यांच्या शेतात त्यांनी प्रथमच पहिल्यांदा लागवड केली होती. नंतर कांदा व लसूण लागवड केली होती. १९५०त१९५५ या काळात भारतात व महाराष्ट्रात शेती संशोधन व शेती शिक्षण देण्याची गरज पाहून केंद्र व राज्य सरकारने शाळा व काॅलेज सुरु केल्या. शेतीत ईंजिनीयरींग अवजार वापरत किर्लोस्करच्या लोखंडी नांगराचा फाळ, लोखंडी नांगर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, गव्हाचे मळणीयंत्र, भात सडायची गिरणी, भुईमुगाच्या शेंगा फोडण्याचे यंत्र अशा रोज नवीन नवीन यंत्र एस्काॅर्टस ट्रॅक्टर, मजसी फर्ग्युसन, महिन्द्रा एन्ड महिद्रा,किर्लोस्कर ग्रुपने बनवायला सुरवात केली परंतु शेतकरी पैशा अभावी ती मशीन विकत घेऊ शकत नव्हता हे बघून महाराष्ट्र सरकारने त्यासाठी विशेष बॅन्कीग नवीन ग्रामीण बॅन्का सरकारी आणि सहकारी बॅन्का स्थापना करून शेतीचा मदत केली. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि जय जवान जय किसान घोषणा झाली व संपुर्ण भारत लष्करी साहित्य व शेती मध्ये प्रगतीला मुहूर्तमेढ झाली. आज भारत इतर देशांना लष्करी साहित्य व अन्नधान्याची निर्यात वाढली. तरीही अजूनही भुकबळी जाण्याचे थांबले नाही. भ्रष्टाचार हे त्याचं प्रमुख कारण आहे. आदिवासी महामंडळ आता काही काम करत असल्याचे दिसत नाही. जनसंघ थोडे फार काही आदिवासी पाड्यांवर जाऊन थोड्याफार प्रमाणात काम करताना दिसून येतो. बाकी राजकीय पक्ष यासाठी काही प्रयत्न करत आहेत असे वाटत नाही हे दुर्दैवाने सत्य परिस्थिती आहे. फक्त विरोधासाठी विरोध एवढाच एकमेव अजेंडा दिसत आहे हे दुर्दैवाने दिसत आहे. तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करताना कुठलाच पक्ष सत्तेत असलेला किंवा नसलेला पक्ष दिसत नाही हि बाब समाजहितासाठी गंभीर आहे. संगमनेर टाईम्सने यासाठी पुढाकार घेऊन समाजासाठी उपयुक्त भुमिका घेतली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.