विकसित – शांत – सुसंस्कृत मतदार संघात घुसून गोंधळ घाळणे हाच…पूर्वेकडच्या परिवाराचा राजकीय धंदा !
विशेष प्रतिनिधी —
आटपाट नगराच्या राजकारणात पूर्वेकडच्या सुभेदारांचा परिवार नेहमीच वादग्रस्त ठरलेला आहे. नगरीच्या प्रत्येक तालुक्यात, मतदार संघात घुसून राजकीय उद्योग आणि काड्या करत बसणे हा पूर्वापार चालत आलेला वडिलोपार्जित राजकीय धंदा तिसऱ्या पिढीने देखील मैदानात उतरवला आहे. परंतु आता या धंद्याचा गोंधळ हा राजकीय राहिला नसून व्यक्तिगत हेवेदावे, शिवराळ भाषा, दादागिरी, दमबाजीची भाषणे असा प्रकार झाला आहे. तारतम्य नसलेले बोलघेवडे ‘रिकामटेकडे युवराज’ पराभवामुळे खचलेले असल्याने मानसिक समाधान आणि शांती शोधण्यासाठी वेडी वाकडी भाषणे करत फिरत असल्याचे चित्र संपूर्ण आटपाट नगरीत पाहण्यास मिळते.

या परिवारामुळे राजकारणाचा स्तर पूर्णतः ढासळला असून दादा परदादांनी उभी केलेली सामाजिक, राजकीय नैतिकता युवराज धुळीस मिळवत असल्याच्या प्रतिक्रिया रयतेमधून ऐकण्यास मिळतात. युवराज यांचे हतबल सुभेदार पिताश्री ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशा अवस्थेत दाबून ठेवल्याने युवराजांचा हा गोंधळ याची देही याच डोळा पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. मोठ्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा स्वतःच्या निष्क्रियतेमुळे आणि मगरुर व घमंडी स्वभावामुळे झाला असल्याचे युवराजांना मान्य नाही. त्यावेळी आटपाट नगरीचे हेर दक्षिणेच्या मतदारसंघात फेरफटका मारण्यास गेले असता ‘इंग्लिशचा नाद’ असलेल्या युवराजांच्या ‘छान’ स्वभावाचे अनेक किस्से ऐकण्यास मिळाले होते. त्याचा परिणाम म्हणून तेथील रयतेने त्यांना चांगलाच धडा शिकविला असल्याचे सांगितले जाते.

परिवारातील बापजाद्यांनी राजकीय सत्तेची कायमस्वरूपी मिळवून ठेवलेली खुर्ची ‘दिवट्या’ राजकुमाराच्या स्वतःच्या बुडा खालून कधी निघून गेली हे समजलेच नाही. आणि आता गडबडलेले हे रिकामटेकडे युवराज राजकारणाची कुठलीही नैतिकता न पाळता मी म्हणजे कोणीतरी अवतारी राजकीय नेता आहे असा अविर्भाव आणत जनतेमध्ये भाषणे ठोकत फिरत आहेत. मुळात फक्त भाषणबाजी ही निवडणुकीत यश देऊ शकत नाही. देशपातळीवरचे मोठे पद मिळूनही मागील पाच वर्ष निष्क्रिय राहिलेला युवराज आता कामाची, बापजाद्यांची आणि दहशतीची उदाहरणे देत फिरत आहे. ही वेळ कोणामुळे आली याचा स्वतः अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. तसे मात्र होताना दिसत नाही. युवराजांच्या अवतीभवती असलेले तथाकथित पीएंचे कोंडाळे आणि आटपाट नगरीतून अडगळीत टाकलेले काही नेते युवराजांच्या फुग्यात हवा भरत आहेत. आटपाट नगरीतल्या गाव पुढार्यांनी अशी हवा पूर्वेकडच्या परिवाराला प्रत्येक निवडणुकीत भरली होती. मात्र त्यांना यश मिळाले नाही. हा इतिहास आहे. आटपाट नगरीच्या निवडणूक निकालानंतर हा फुगा देखील फुटणार असून युवराज आणि त्यांचे समर्थक नक्कीच ताळ्यावर येतील अशी आशा भाबड्या रयतेला आहे.

