रिकामटेकडे युवराज आणि युवाताईची संवाद यात्रा ! 

अफाट खर्च ; पैसा येतो कोठून ?

विशेष प्रतिनिधी —

आटपाट नगरीत सध्या निवडणुकीचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी सुभेदारांच्या युवाताई आणि सध्या रिकामटेकडे असलेले युवराज अशा मंडळींचा जनसंवाद, युवा संवाद दौरा, यात्रा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत रिकामटेकड्या लोकांचा हा नवा छंद म्हणावा लागेल. या यात्रा अतिशय भव्य, खर्चिक, कार्यकर्त्यांच्या नाच गाण्याला उधान आलेल्या, घोषणाबाजी, वाचाळ भाषणे याने गाजत आहेत. मात्र कुठलाही काम धंदा करत नसताना एवढा मोठा खर्च करून, गाड्या, कार्यकर्ते, जेवणावळी, सोशल मीडियाचा खर्च, पोस्टर, बॅनर, जाहिराती या सर्वांसाठी आणि यासह इतर उद्योगांसाठी नेमका पैसा कुठून येतो, या पैशांचा सोर्स काय याचबरोबर असे अनेक प्रश्न आटपाट नगरीच्या रयतेला पडले आहेत.

सध्या आटपाट नगरीत युवाताईंनी संवाद यात्रेचा जोर धरला आहे. ताईंच्या मागे पुढे लाभार्थी कार्यकर्त्यांची फौज आहे. तेच तेच तोंडं पाहून रयत देखील ज्यांना वैतागली आहे अशी रिकामटेकडी मंडळी ताई भोवती फिरत आहे. यामध्ये मुळशी पॅटर्न राबवणारे, जमिनीचे घोटाळे करणारे, गोरगरिबांच्या जागा जमिनी लुटणारे, बेकायदेशीर बांधकामे करणारे असे विविध प्रकारचे आरोप असलेले संशयित या सगळ्यांचा समावेश आहे. ज्या नवीन आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना युवाताईंच्या संघटनेत आणि नेतृत्वाखाली काम करायचे आहे ती मंडळी या जुन्या लाभार्थी आणि चिकटून बसलेल्या टोळी मुळे बाजूला पडली आहे. युवाताईंच्या अवतीभवती असलेले कोंडाळे कधी दूर होईल याची प्रतीक्षा ते करीत आहेत.

या आधी देखील आटपाट नगरीत निर्माण झालेल्या युवराजांभोवती अशीच टोळी फिरत होती. तेच तेच टोळके आता युवाताईं भोवती गोळा झाले आहे. समाजसेवेची, सामाजिक कार्यांची कुठलीही दानत नसलेली ही लाभार्थी मंडळी अति उत्साहीपणे मिरवण्यात आणि सोशल मीडियात रील, फोटो टाकून धन्यता मानण्यात पटाईत झालेली आहे.

दुसरीकडे पूर्वेकडच्या सुभेदारांचे सुपुत्र आणि सध्या रिकामेच असलेले युवराज देखील संवाद यात्रा काढू लागले आहेत. या संवाद यात्रेतील कार्यकर्ते आणि येणाऱ्या लोकांची उपस्थिती पाहता ही मंडळी कुठून गोळा करून आणली आहे याची कल्पना रयतेला येते. त्यासाठी महागड्या गाड्यांची भरपूर रेलचेल असते. पेट्रोल, डिझेल, बाउन्सर, बॉडीगार्ड, पुढे मागे करणारी पीए मंडळी, जेवणावळी, चहापाणी नाश्ता, फुलांचा वर्षाव, जेसीबीचा खर्च, फटाकड्यांची आतिषबाजी, महागडी साऊंड सिस्टिम, वाजंत्री, डीजे असा सर्व धामधुमीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. हा प्रकार दोन्हीकडे आहे. संवाद यात्रा या जनतेशी संवाद करणाऱ्या यात्रा राहिल्या नसून नव्या टोळ्यांना आणि युवाताईंना, रिकाम्या लोकांना भाषणबाजीची प्रॅक्टिस, राजकीय आरोप प्रत्यारोप यासाठी एक इव्हेंट करून देण्यात आला असल्याचे चित्र आहे.

रिकामटेकड्या युवराजांचे भाषण म्हणजे रयतेला करमणूक कार्यक्रम झाला आहे. आपल्या वाचाळ भाषणामुळे रयतेने जो आपल्याला काही महिन्यांपूर्वी धडा शिकवला आहे, त्यातून कुठलाही धडा न घेतलेले हे युवराज आपली सुंदर शाब्दिक चिखल फेक करीतच आहेत. कुठलाही वडिलोपार्जित वारसा युवराज यांनी स्वीकारला नसल्याने हे चित्र पहावे लागत असल्याच्या रयतेच्या प्रतिक्रिया आहेत. तोंडाळ लोकांमुळे पुराण काळापासून अनेकांचे नुकसान झाले आहे. ते काम युवराज आणि त्यांच्यासोबत असलेले आणि दिशाभूल करणारे पीए नावाचे भाट करीत आहेत.

आटपाट नगरीचे सुभेदार आणि पूर्वेकडचे सुभेदार यांची राजकीय सुंदोपसुंदी नेहमीप्रमाणे सुरूच आहे. पूर्वेकडचे युवराज आटपाट नगरीत राजकीय दुकान उघडण्याच्या तयारीत आहेत. दक्षिणेतील त्यांचे दुकान रयतेने बंद पडले आहे. आता नव्याने आटपाट नगरीत घुसून आपला वडिलोपार्जित धंदा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशी घुसाघुशी त्यांनी संपूर्ण परगाण्यात विविध मतदारसंघात केल्याचा इतिहास आहेच. निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत रयतेला युवाताईंचा आणि युवराज यांच्या संवाद दौऱ्यांचा धुमाकूळ सहन करावा लागणार आहे.

याच दरम्यान अनेक जुने पारंपरिक, ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते, पुढारी अडगळीत गेले आहेत. आटपाट नगरीच्या नावाजलेल्या ज्येष्ठताई यांना सध्या सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. आटपाट नगराचे माजी सुभेदार हे देखील सध्या निवांत आहेत. विद्यमान युवराज इकडे तिकडे आणि कुणीकडेच नाहीत. नेमके कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नसल्याने त्यांची देखील हालचाल मंदावलेली दिसते. आता निवडणुकीने जोर धरल्यानंतर ही सर्व मंडळी आटपाट नगरीत अवतरणार आहे. पूर्वेकडचे युवराज निवडणुकीत खरेच उतरले तर निवडणुकीला रंगत येणार आहे. या निवडणुकीत असल्या उथळ जनसंवाद यात्रांनी किती फरक पडला आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल.

RRAJA VARAT

One thought on “रिकामटेकडे युवराज आणि युवाताईची संवाद यात्रा ! ”
  1. छान लिहिले भाऊ 👌🏻वस्तुस्थिती मांडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!