संगमनेरातील घडामोडी ; जिल्हा पोलीस आणि प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज
बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात…
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून तालुक्याबाहेरील मंडळींना बोलावून संगमनेर तालुक्याची शांतता कायदा आणि सुव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. बाहेरच्या गुंडांना हाताशी धरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे संगमनेर तालुका प्रशासन, पोलिसांनी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळीच सावध होऊन सर्व तक्रारींच्या सखोल चौकश्या करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच कुठलाही दबाव येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी देखील संगमनेरवर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने थोरात – विखे यांच्यात जोरदार हल्लाबोल सुरू आहे. राजकारणाचे वळण हिंसक मार्गावर चालले आहे. त्याचप्रमाणे टीका टिप्पण्यांनी पातळी सोडली असून महिलांचा अवमान करण्याचा सपाटा लावण्यात आलेला आहे. होणाऱ्या सभांमधून दोन्हीकडून जोरदार टीका आणि भाषणे सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले असले तरी हे वातावरण शांततापूर्ण राजकीय वातावरण न राहता ते आता कायदा व सुव्यवस्था मोडीत काढण्याच्या दिशेने निघाले आहे. याकडे संगमनेर तालुका प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांनी देखील बारकाईने लक्ष ठेवून वेळीच कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसात संगमनेरात घडलेल्या विविध घडामोडी आणि त्यासंदर्भा संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा कसून तपास होणे गरजेचे आहे. यामध्ये कोणी बाहेर गावाहून संगमनेर मध्ये येऊन राजकीय गैरकृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत का ? किंवा संगमनेर तालुक्यात अशा घटनांमध्ये तुमचा संबंध येतोच कसा ? शिवाय विनाकारण गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करणारे अज्ञात इसम कोण आहेत ? याचा कसून तपास होणे गरजेचे आहे. थोरात – विखे यांच्याकडून एकमेकांविरुद्ध आरोप सुरू असले आणि दडपशाही व दहशतीबद्दल एकमेकांच्या विरुद्ध टीका करून कार्यकर्ते एकमेकांना टार्गेट करीत आहेत. अशा सर्व कार्यकर्त्यांची, तक्रारदारांची देखील चौकशी करण्यात यावी. तसेच अज्ञात इस्मानवरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि इतर तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा यातील जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून संवेदनशील संगमनेरच्या विविध निवडणुका शांततेत आणि व्यवस्थित पार पडलेल्या आहेत. याच वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच दहशत आणि गोंधळाचे वातावरण सुरू झाले आहे. मतदान आणि निकालासाठी अद्याप बरेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे पुढे आणखी काय होईल याबाबत भीती व्यक्त होत आहे. नगर जिल्हा पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने या बाबीकडे गंभीर्याने लक्ष ठेवावे आणि संगमनेरची शांतता अबाधित ठेवावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

