वाचाळ ‘रिकामटेकड्या टायगर’ने अखेर शेपूट घातले !
दोन्ही सुभेदारांची ‘लुटुपुटू’ ची लढाई सुरू…
पूर्वेकडच्या सुभेदारांचा ‘नवा बकरा नवे राज्य’..
विशेष प्रतिनिधी —
आपल्या वाचाळ भाषणखोरीने आणि मग्रूर वागणुकीने संपूर्ण आटपाट नगरीच्या परगण्यात सुप्रसिद्ध असलेल्या रिकामटेकड्या युवराजांनी आटपाट नगरीत राजकीय गोंधळ घालून नगरीची शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडवली. सर्वसामान्य रयतेला वेठीस धरले. निवडणुकीच्या वल्गना केल्या. मात्र अखेर आटपाट नगरीच्या तहहयात सुभेदारांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी माघारीचे शेपूट घातले. सध्या ‘शेपूट घातलेला रिकामटेकडा टायगर’ अशी ओळख युवराजांची आटपाट नगरीत झाली आहे.

निवडणुकीचे वारे सुरू असल्याने दोन्ही सुभेदारांच्या, अनेक पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या जनसेवकांच्या, सुभेदार मंत्र्यांच्या लाभार्थ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या अंगात वारे संचारले आहे. त्यामुळे आटपाट नगरीच्या रयतेला गृहीत धरून दोन्ही सुभेदारांच्या गटातील लाभार्थी नगरीत राजकीय गोंधळ घालताना दिसतात. त्यात सत्तेचा लाल दिवा ताब्यात असलेले सुभेदार मंत्री “ह्याला जेलमध्ये टाकू का त्याला जेलमध्ये टाकू” असा सत्तेचा सोटा घेऊन बसले आहेत.

आटपाट नगरीत निवडणुकीचे वातावरण सुरू झाल्यावर संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात मग्रूर म्हणून प्रसिद्ध असलेले आणि निवडणुकीच्या रिंगणात नुकतेच सपाटून मार खाल्लेले युवराज आटपाट नगरीत येऊन राजकीय कुरघोड्या करू लागले. सोबतीला आपल्या वडिलोपार्जित मिळालेल्या सुभेदारीतून वेगवेगळ्या लाभार्थींना गोळा करून, गुंड प्रवृत्तीची मंडळी गोळा करून, आजोबाच्या काळापासून अडगळीत पडलेले काही ‘रिकामटेकडे म्हातारडे’ सोबतीला घेऊन आटपाट नगरीत वेगवेगळी वाचाळ आणि चितावणीखोर भाषणे करून रयतेला वेठीस धरू लागले. त्यातून आटपाट नगरीची शांतता धोक्यात आली.

मुळात आटपाट नगरीचे सुभेदार आणि पूर्वेकडचे मंत्री सुभेदार या दोघांचे आपापल्या सुभेदाऱ्या टिकवण्यासाठी राजकीय भांडण नेहमीचे झाले आहे. हे भांडण किती खरे किती खोटे हा नेहमी चर्चेचा विषय ठरलेला आहे. पूर्वेकडच्या सुभेदार मंत्र्यांचे युवराज सध्या रिकामेच असल्याने आटपाट नगरीत येऊन स्वतःची करमणूक करून घेत असले तरी त्यातून सर्वसामान्य जनतेला मात्र त्यांच्यामुळे त्रास सहन करावा लागलेला आहे.

विशेष म्हणजे आटपाट नगरीत महिलांविषयी करण्यात आलेले अभद्र व्यक्तव्य आणि त्यातून झालेली जाळपोळ आणि हिंसक वळण या दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत. आणि त्यांचा निषेध सर्वत्र करण्यात आलेला आहे. हे करण्यात दोन्ही सुभेदारांची लाभार्थी मंडळी आघाडीवर असल्याचे चित्र दिसून आले. मात्र हे घडले कोणामुळे आणि का घडवण्यात आले हे सर्व रयतेला माहित आहे. त्यामुळे आता आपली पूर्ण उरली सुरली….. महिलांचा अपमान केल्यामुळे चव्हाट्यावर आल्याने निवडणुकीत उभे राहण्याच्या वल्गना करणारे टायगर शेपूट घालून बसले आहेत.


आता प्रचार सुरू झाल्यावर पुन्हा ते आटपाट नगरीत येऊन आरडाओरडा करून आपले वाचाळ शब्दप्रयोग रयतेवर करतील आणि पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे पिताश्री पूर्वेकडचे सुभेदार मंत्री नाईलाजाने आपल्या बाळाचा हट्ट पुरवण्यासाठी आटपाट नगरीच्या सुभेदारांच्या लाडक्या कार्यकर्त्यांना, लाभार्थ्यांना अडचणीत आणून गुन्हे दाखल करण्याचा व तुरुंगात टाकण्याचा सपाटा लावतील. त्यासाठी पोलिसांचे काम करण्यास त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते तयार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. एकमेकांवर गुन्हे दाखल केले जातील, एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केले जातील, गरळ ओकली जाईल असे अनेक प्रयोग आणि ‘दोघांचे भांडण, दोघांचा लाभ’ हा पारंपारिक चित्रपट आटपाट नगरीत व पूर्वेकडच्या सभेदारीत पाहण्यास मिळेल. मात्र हे दोन्ही सुभेदार एकमेकांच्या विरोधात प्रत्यक्ष निवडणुकीला उभे राहून लढणार नाहीत, हे तितकेच खुले सत्य पुन्हा बाहेर आल्याने रयतेने आता सर्व काही लक्षात घ्यावे अशी सूचना आटपाट नगरीतील बुजुर्ग मंडळींकडून करण्यात येत आहे.


एकमेकांच्या विरोधात कधीही प्रत्यक्षात निवडणुकीला उभे न राहिलेले हे दोन्ही सुभेदार आणि त्यांचे तथाकथित राजकीय सगे सोयरे, भाऊबंद मस्तपैकी सत्तेची पदे उपभोगतात. निवडणुकीच्या अलीकडे पलीकडे वृत्तपत्रातून कागदी घोडे नाचवतात, त्यांचे बगलबच्चे युवराज, सोयरे मंडळी, लाभार्थी आक्रमकपणे बोलबच्चन करत फिरतात, निवडणुका होतात, निकाल लागतो, दोन्ही सुभेदार आलटून पालटून मंत्री पदाच्या सत्तेत जाऊन बसतात. रयतेची मात्र दररोजची जीवन जगण्याची धावपळ सुरूच राहते. आणि पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक येते….




अगदी खर आहे ।
ये पब्लिक है सब जानती है।