मुजोर / बदनाम पदाधिकारी, लाभार्थी – धार्मिक राजकारण – लाडकी बहिण – तरुणाईचा न समजलेला कल आणि अति आत्मविश्वास या कारणांमुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव !
प्रतिनिधी —
१ लाख १ हजार ८२६ मतदारांनी दाखवलेला विश्वास सोबतीला असूनही १० हजार ५६० मतांनी काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव मुजोर / बदनाम कार्यकर्ते, लाभार्थी, पदाधिकारी – धार्मिक राजकारण – लाडकी बहिण – तरुणाईचा न समजलेला कल आणि अति आत्मविश्वास या कारणांमुळे झाला असल्याचा बोलले जात आहे.

1985 पासून सलग आठ वेळा निवडून येत 40 वर्ष आमदारकी मिळविणारे, सुमारे साडे सतरा वर्ष मंत्री पदावर असणारे राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांच्या धक्कादायक पराभवाबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू असून थोरात यांचा पराभव हा त्यांच्या चुकांमुळे आणि दुर्लक्षामुळे झाला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तरीही राजकारणातल्या सरळ आणि सज्जन व्यक्तिमत्त्वाचा पराभव झाल्याने अनेक ज्येष्ठ आणि सुज्ञ नागरिकांकडून हळहळही व्यक्त होत आहे.

त्याचबरोबर थोरातां सोबत अनेक वर्षांपासून असलेले मुजोर कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी यांच्या विषयी असलेला राग, संगमनेरातील धार्मिक ध्रुवीकरण, लाडकी बहीण आणि तरुणाईचा न समजलेला कल ही सर्व कारणे थोरात यांच्या पराभवासाठी महत्त्वाची मानली जात आहेत. संवेदनशील संगमनेर मध्ये धार्मिक वादात कधीही हस्तक्षेप न करणारे आणि धार्मिक वादाला कुठलेही खत पाणी न घालणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात धार्मिक कारणामुळे आपल्या आमदारकीला मुकले आहेत असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून थोरातां भोवती असलेले त्यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी यांनी केलेले अनेक उद्योग, गावागावात त्यांची आपल्याच कार्यकर्त्यांवर आणि सामान्य माणसावर असलेली दादागिरी, त्यांनी केलेल्या चोऱ्यामऱ्या, त्यांच्याविषयी असलेल्या विविध तक्रारी, गौण खनिज वाळू तस्करी, स्टोन क्रशर संदर्भात त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि दंडाच्या कारवाया, तसेच बिनकामाच्या लोकांना दिलेली पदे, मुळशी पॅटर्न सारखा जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार राबवणारे पदाधिकारी, सगे सोयरे, भाऊबंद, विविध कामांमधल्या ठेकेदाऱ्या, अवैध बांधकामात सहभागी असणारे पदाधिकारी अशा लोकांना थोरात यांनी अनेक वेळा सांगूनही पाठीशी घातल्यामुळे त्यांचा पराभव होण्यात या लोकांवर असलेली नाराजी देखील कारणीभूत ठरली असल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर तालुक्याला सहकारातील एक समृद्ध तालुका म्हणून ओळख आहे. या तालुक्यात सहकाराविषयी आत्मीयता आणि आपुलकी आहे. जनतेचा थोराजांच्या ताब्यात असलेल्या संस्थांवर आणि त्या संस्थांच्या कार्यावर विश्वास आहे. मात्र त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्थांमधून जनतेची लूट झाली. दुधगंगा नागरी पतसंस्थेसारख्या काही संस्थान मधून शंभर कोटीचे घोटाळे करण्यात आले. त्यामध्ये आरोपी असलेले पदाधिकारी हे थोरात यांचे जवळचे कार्यकर्ते राहिले. गुन्हे दाखल असूनही त्यांच्यावर थोरात यांनी पक्षीय अथवा त्यांच्या संस्थात कार्यरत असून देखील कुठलीही कार्यवाही केली नाही. त्या संदर्भात कधी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. नागरिकांना दिलासा दिला नाही. हेही कारण मतदारांच्या नाराजी मध्ये दिसून आले आहे.

शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांबाबत, अवैध धंद्यांबाबत, शहरात घडलेल्या विविध हिंदू मुस्लिम वादांमध्ये, हाणामाऱ्यांमध्ये आणि शहराचे हॉटस्पॉट असलेल्या जोर्वे नाका परिसरात घडलेल्या घटनांमुळे देखील संगमनेरच्या राजकारणावर परिणाम झाला. या प्रकरणांमध्ये थोरात यांनी कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही असे अनेक युवा कार्यकर्त्यांचे मत आहे. वेळोवेळी अशा घटनांच्या वेळी थोरात यांनी नेहमीच मौन बाळगले आहे. शिवाय थोरात यांचे काही कार्यकर्ते कधी हिंदुत्ववादी तर कधी थोरातंबरोबर अशी ‘डबल ढोलकी’ ची भूमिका बजावत असल्याने या कार्यकर्त्यांविषयी देखील तरुण विशेषतः हिंदुत्व मानणाऱ्या तरुण मुलांमध्ये छुपा राग होता. अशा लोकांमुळे देखील थोरात यांच्या मतांवर परिणाम झाला असल्याचे तरुणांकडून ऐकण्यास मिळते.

एकंदरीत महत्त्वाचे ठळक मुद्दे लक्षात घेता थोरात यांचे वादग्रस्त कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी, धार्मिक ध्रुवीकरण, तरुणांच्या मनाचा कल लक्षात न आल्याने आणि लाडकी बहीण योजना या महत्त्वाच्या कारणांबरोबरच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांचा केलेला आक्रमक प्रचार, त्यांनी उपस्थित केलेले राजकीय मुद्दे यावर जनतेने विश्वास ठेवला. पारंपारिक दुष्काळी भागातून थोरात यांना विरोध झाला. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच मतं केंद्रांवर आमदार खताळ यांना आघाडी मिळाली आणि थोरात यांच्या 40 वर्षाच्या आमदारकीला आव्हान उभे करून आमदार खताळ हे विजयी झाले.

