संगमनेरात धार्मिक कलह वाढविण्याचा प्रयत्न 

छुपे कट्टरतावादी ओळखण्याचे पोलिसांसमोर आव्हान 

संगमनेर दि. 5

एकेकाळी दंगलीचे शहर आणि धार्मिक वादांबाबत संवेदनशील असणारे संगमनेर शहर गेली अनेक वर्ष शांत आणि सुसंस्कृत रित्या प्रगतीपथावर आणि विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू झालेला धार्मिक वाद आणि त्यातून होणाऱ्या लहान मोठ्या हाणामाऱ्या आणि त्याचे उमटणारे पडसाद, होणारा तणाव यामुळे संगमनेरची शांतता बिघडवण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. राजकारणासाठी धार्मिक कलह वाढवण्याचा प्रयत्न सुरू असून या मागचे छुपे कट्टरतावादी कोण आहेत याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक असून सत्य सर्वांसमोर आणणे गरजेचे आहे.

निवडणुका सुरू होण्याच्या आधीपासून संगमनेर शहरात विविध हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जास्त करून मुस्लिम हिंदू प्रकरणे अधिक आहेत. त्यातच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही मंडळी याचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन्हीकडच्या समाजाला समजून सांगण्याऐवजी कुठलीतरी एकच बाजू घेऊन वातावरण भडकवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. यामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. काही मंडळी आणि ग्रुप वर फक्त एकाच धर्माच्या बाजूने टीका टिप्पण्या चालू असतात आणि वातावरण कसे भडकेल असे प्रयत्न सुरू आहेत. अशा मंडळींना शोधून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.

त्यामुळे संगमनेर हिंदू मुस्लिम धर्मात सामाजिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. याला छुपे कट्टरतावादी खतपाणी घालत आहेत. शांत संगमनेर मध्ये गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू झाला आहे. याचा राजकीय फायदा कोणाला झाला, याचा राजकीय फायदा कोण घेत आहे आणि याचा राजकीय फायदा भविष्यात कोणाला होणार आहे, हे सर्वश्रुत आहे. जनता दूधखुळी नाही. परंतु काही नागरिक, युवक अशा भडकावणाऱ्या गोष्टींच्या मागे लागून आपले आयुष्य बरबाद करून घेऊ शकतात त्यामुळे याबाबत सर्वांनीच सावध असणे आवश्यक आहे.

संगमनेरच्या दंगलींच्या आणि धार्मिक तणावाच्या हाणामाऱ्यांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर यामध्ये अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त झाले, गुन्हे दाखल झाले, कोर्ट कचेऱ्या यांच्या चकरा सुरू झाल्या. 15 ते 20 वर्ष या तरुणांना कोर्ट केसेस मध्ये चकरा मारण्यात आयुष्य घालवावे लागले. त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधांवर परिणाम झाला. वैवाहिक जीवनावर परिणाम झाला. नोकरी मिळण्यापासून त्यांना वंचित राहावे लागले. गुन्ह्यांचा आणि पोलिसांचा ससेमिरा कायम त्यांच्या पाठीशी राहिला. याचे परिणाम नेहमी वाईटच होतात हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. अनेकांनी कष्ट झेलले, संसार, व्यवसाय उध्वस्त केले मात्र आज ‘दुसरेच मलिदा खात आहेत’ हेही तेवढेच सत्य आहे.

बऱ्याच वर्षांच्या कालावधीसाठी संगमनेर शांतता नांदत होती. शहरातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित होती अनेक वर्ष धार्मिक वाद घडले नाहीत. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी पासून अशा घटनांना खत पाणी घातले जात असून घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे या मागचे छुपे कट्टरतावादी शोधून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी दोन्ही धर्मातील समाजातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!