इंटरनेटच्या व्यसनामुळे मुलांमध्ये आत्ममग्नता वाढत आहे – मुक्ता चैतन्य 

अकोले दि. 7

लहान मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमालीचा वाढल्यामुळे त्यांचा मेंदू दिवसेंदिवस आकुंचित होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या ठायी असलेली आकलन आणि भाषा शिक्षणाची मूलभूत क्षमता नष्ट होत आहे. इंटरनेटचे व्यसन जडलेल्या मुलांमध्ये आत्ममग्नता(व्हर्च्युअल ऑटिझमचे रुग्ण) वाढत आहेत. समाज म्हणून आगामी काळात याची जबर किंमत मोजायला लागणार आहे असा सावधगिरीचा इशारा समाज माध्यमांच्या अभ्यासक, पत्रकार मुक्ता चैतन्य यांनी दिला.

अकोले तालुका पत्रकार संघ व तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने अकोले पंचायत समिती सभागृह येथे “आजच्या डिजिटल मीडियातील आव्हाने” या विषयावर मुक्ता चैतन्य बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे, पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, प्रकाश टाकळकर उपस्थित होते.

यावेळी मुक्ता चैतन्य म्हणाल्या की, डिजिटल जगात तुम्ही पत्रकार असो की नसो, इतर कुठल्याही व्यवसायात असो, नुसते युजर असा सर्क्युलर रिपोर्टींगमध्ये अनेकांचा कळत नकळत सहभाग असतो. आणि त्यातून अनेक प्रश्न तयार होत आहेत. एखादी खोटी, अर्धसत्य माहिती सर्क्युलर रिपोर्टींगमुळे खरी असल्याचा आभास निर्माण होतो. त्या आभासी असत्याच्या आधारावर माणसं स्वतःची मतं बनवण्यापासून निरनिराळ्या प्रसंगात निर्णय घेण्यापर्यंत अनेक गोष्टी करत आहेत. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी तर यापासून दूर राहिलंच पाहिजे पण प्रत्येक युजरनेही आपण याचा कळत नकळत भाग होत नाही ना हे तपासण गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.

इंटरनेटचे जडलेले व्यसन, सुरक्षित नसलेला नागरिकांचा डेटा, वाढत चाललेले सायबर गुन्हे आणि विश्वासार्हता आणि अधिकृत स्त्रोत माहिती नसताना सोशल नेटवर्किंग साईट्समधून(सर्क्युलर जर्नालिझमच्या माध्यमातून) पसरवली जाणारी खोटी माहिती ही आजच्या डिजिटल काळातील मोठी आव्हाने आहेत. मोबाइलसारखी गॅझेट्स वापरणारे लोक केवळ तंत्रशिक्षित आहेत. डिजिटल काळात माध्यम शिक्षित समाजाची नितांत गरज आहे. दुर्दैवाने आपल्या समाजात माध्यम शिक्षण कमालीचे दुर्लक्षित आहे. त्याविषयी मांडणी करत असतानाच ‘सर्क्युलर रिपोर्टींग किंवा सर्क्युलर पत्रकारिता’ या अतिशय महत्वाच्या आणि दुर्लक्षित विषयाची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.

आमदार डॉ.किरण लहामटे यांनी समाजकारण, राजकारणातील वाईट प्रवृत्तींवर घाव घालण्याची ताकद पत्रकारितेत आहे, समाजा पुढील प्रश्न पत्रकारांनी ताकदीने उचलले पाहिजेत असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य यांनी तालुक्यातील पत्रकारितेच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रास्ताविक व स्वागत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्रीनिवास रेणूकदास यांनी तर पाहुण्यांचा परिचय भाऊसाहेब चासकर यांनी करून दिला. अध्यक्षीय सूचना प्रकाश महाले यांनी मांडली. त्यास नंदकुमार मंडलिक यांनी अनुमोदन दिले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश आरोटे व सचिव चंद्रशेखर हासे यांनी केले. आभार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशश्वीसाठी विद्याचंद्र सातपुते, गणेश आवारी, अमोल पवार, नरेंद्र देशमुख, विलास तुपे, आबासाहेब मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे, हर्षदीप डावरे, राजू मालुंजकर, दिनेश जोरवर, हरीश कुसळकर, यांनी विशेष प्रयत्न केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!