महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ;
ख्रिस्ती विकास परिषदेच्या आठव्या वर्धापन दिनाचे मुंबई येथे आयोजन

प्रतिनिधी —
पंथ सारे विसरून जाऊ! ख्रिस्ती सारे एक होऊ!!
या ब्रीदवाक्या खाली स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचा ८ वा वर्धापन दिन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर हॉलमध्ये दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता साजरा होणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. प्रफुल्ल असुर्लेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली.
या वर्धापन दिनास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार राजीव आवळे, राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या माजी उपाध्यक्ष श्रीमती जेनेट डिसोझा, फादर फेजर मास्कारेंन्स, माध्यम सल्लागार प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार सॉलोमन गायकवाड, प्रोफेसर राम पुनियानी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. सिरील दारा, मुंबई विभागीय अध्यक्ष डॅऱिल डिसुझा, ख्रिस्ती साहित्यिक व संशोधक विश्वास वळवी, ग्रॅहम स्टेन्स चित्रपटाचे निर्माते दिलीप वाघ, कृपा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जेम्स तिवडे, चित्रपट डायरेक्टर नथानी यलशेलार, डॅरिल मेंनेंजिस, रेमंड क्रियाडाे उपस्थित राहणार आहेत.

ख्रिस्ती समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गेल्या वीस वर्षापासून परिषद कार्यरत असून आजपर्यंतच्या कार्याच्या मूल्यांकन मेळाव्याबरोबरच राज्यातील ख्रिस्ती समाजातील अविरत काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही यावेळी करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या कार्याचा महाराष्ट्रात मोठा विस्तार होत असून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या संदर्भात योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यास राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती अँड. सिरील दारा, व डॉ. प्रफुल्ल असुर्लेकर यांनी दिली आहे.
