प्रजासत्ताक दिनी एक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना !
२६ दिवसांतच ६५ कोटी सूर्यनमस्कारांची पूर्तता
प्रतिनिधी —
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ, हार्टफुलनेस इंस्टिट्युट व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या संस्थांनी ७५ कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प केला आहे. १ जानेवारीपासून सुरु झालेल्या या राष्ट्रीय उपक्रमात प्रजासत्ताक दिनी देशभरातील ७५० केंद्रांच्या माध्यमातून एका लाखांहून अधिक जणांनी एकाचवेळी सूर्यनमस्कार घालून अभिनव पद्धतीने राष्ट्रवंदना केली.

वेदांनी संपूर्ण वसुंधरेलाच आपली जननी मानले आहे. परंतु, त्यातही भारतमातेचे विशेष स्थान आहे. जे आपल्या देशाच्या मातीत आहे ते केवळ अद्भूत आहे. विभिन्न प्रकारचे सृष्टीसौंदर्य आणि समृद्धीने नटलेल्या आपल्या देशाला म्हणूनच ‘सोने की चिडिया’ म्हटले गेले आहे. समृद्धीसोबतच आपल्या देशाने निर्माण केलेल्या संस्कृती समोरही अवघं विश्व आपोआपच नतमस्तक होते. आपल्या भूमीतील तक्षशिला, नालंदा सारख्या विश्वविद्यालयांनी ज्ञानाचा आलोक पसरविला आहे. अशा या महान देशाला राष्ट्रवंदना करतांना स्वातंत्र्य संग्रामात आपाल्या प्राणांची आहुती देणार्या क्रांतिकारकांचे स्मरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे संस्थापक तथा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी स्वामीजी बोलत होते. यावेळी योगमहर्षी स्वामी रामदेव बाबा, पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ.जयदीप आर्य, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, क्रीडा भारतीचे मिलिंद डांगे व हार्टफुलनेस इन्स्टिट्युटच्या एकता बुडैरलिक आदी उपस्थित होते.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की, जगाला ज्ञानासोबत योगविद्या देणारा आपला देश विश्वाचे नेतृत्त्व करीत आहे. समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या देशाला सांस्कृतिक नेतृत्त्वाची आवश्यकता होती, ती स्वामी विवेकानंदानी पूर्ण केली. स्वामी रामदेव बाबा यांच्या संकल्पनेतून आज हा सांस्कृतिक वारसा जगात नेण्याचा उपक्रम हाती घेवून गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ, हार्टफुलनेस इंस्टिट्युट व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या पाच संस्थांनी संयुक्तपणे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष संस्मरणीय बनविला आहे. आज देशभरातून एक लाखांहून अधिक जणांनी एकाचवेळी सूर्यनमस्कारातून केलेली राष्ट्रवंदना केवळ अद्भूत आहे.
स्वामी रामदेव बाबा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ७५ कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प स्वप्नवत वाटत असल्याचे सांगितले. मात्र देशभरातील हजारों शाळा, संस्था व व्यक्तिंनी या उपक्रमाशी संलग्न होवून प्रजासत्ताक दिनी त्यांचे प्रदर्शन भव्य आणि दिव्य स्वरुप देशासमोर ठेवल्याचे सांगितले. या संकल्पासाठी देशवासीयांनी दिलेला प्रतिसाद पाहता २० फेबु्रवारीपूर्यंत सुमारे शंभर कोटी सूर्यनमस्कार पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्कर्म करण्यातही सात्त्विक समाधान व स्वगौरव असतो, ज्याला आपल्याकडे स्वाभिमान म्हटले जाते. हा स्वाभिमान आज आपण प्राप्त केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जगाची दिशा, सम्यक जीवन दर्शन काय असायला हवे याचा शोध घेतल्यास तो भारतीय ऋषी संस्कृतीपर्यंत येवून थांबत असल्याचे सांगतांना ते म्हणाले की, येणार्या दोन-तीन दशकांत आम्ही सर्वांनी सुरु केलेल्या या प्रयत्नांचे फळ जगासमोर येईल आणि संपूर्ण विश्व भारतीय संस्कृतीच्या छायेखाली येवून योगच्या माध्यमातून सुख, समृद्धी आणि शांतीची कवाडे उघडली जातील. ७५ कोटी सूर्यनमस्काराच्या या राष्ट्रव्यापी संकल्पात विश्व किर्तिमान स्थापन करण्यात गीता परिवाराची मोठी भूमिका आहे. एकाचवेळी एक लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घालण्याचा हा प्रयोग जगात अद्भुत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी डॉ.जयदीप आर्य, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ व हार्टफुलनेस इन्स्टिट्युटच्या श्रीमती एकता बुडैरलिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ७५ कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाचे प्रकल्प संयोजक डॉ.संजय मालपाणी यांनी यावेळी देशभरातील ३० हजार शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसह या उपक्रमात एकूण ४५ लाख ६४ हजार ६११ योगप्रेमी सहभागी झाले असून त्यांच्याकडून दररोज प्रत्येकी १३ सूर्यनमस्कार या प्रमाणे आत्तापर्यंत ६५ कोटी ११ लाख ४ हजार ५०६ सूर्यनमस्कार घातले गेल्याची माहिती दिली व येत्या काही दिवसांतच हा संकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता जाधव, गिरीश डागा, मिहिर जाधव, निलेश पठाडे, क्षीतिज महापात्र, सचिन जोशी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

सुमारे एक लाखांहून अधिक जणांच्या ऑनलाईन सहभागासह या उपक्रमात युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक लोक जोडले गेले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रणव पतवारी यांनी लिहिलेल्या व भूषण देशमुख यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सूर्यनमस्कार हम करें, शक्ति-साधना का प्रण करें’ या गीतावर योगवंदना सादर करीत केले. नृत्यदिग्दर्शक म्हणून सोनाली महापात्रा यांनी तर प्रशिक्षक म्हणून मंगेश खोपकर यांनी आपली भूमिका बजावली.
