खुनातील आरोपीला तीन वर्ष कारावासाची शिक्षा
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यातील एका खून खटल्यात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त करताना गंभीर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीन वर्ष कारावास आणि १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन पैकी एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविले.

नामदेव रामा सारोक्ते व नामदेव इंद्रभान सारोक्ते (रा. सोमलवाडी, ता. अकोले) यांनी केलेल्या मारहाणीत बुळेवाडी, (ता. अकोले) येथील ५५ वर्षीय प्रभाकर रामभाऊ गंभीरे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजुर (अकोले) पोलीस ठाण्यात मृत प्रभाकर गंभीरे यांची सासू यमुनाबाई तुळशीराम सारोक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीं विरोधात खून केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.

२५ मार्च २०१३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रभाकर रामभाऊ गंभीरे हे आपल्या सासूकडे सोमलवाडी येथे आले होते यावेळी सासरवाडी पासून काही अंतरावर असलेल्या नामदेव रामा सारोक्ते यांच्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाजवळ मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याचा आवाज आल्याने फिर्यादी यमुनाबाई सारोक्ते बाहेर आल्या व घटनास्थळी गेल्या असता त्यांना नामदेव रामा सारोक्ते आणि नामदेव इंद्रभान सारोक्ते हे जावई प्रभाकर गंभीरे यांना खाली पाडून पोटात लाथाबुक्याने मारहाण करत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी मध्ये पडत सोडवासोडवी केली.

त्यानंतर रात्री प्रभाकर गंभीरे यांनी आपल्या पोटात दुखत असल्याचे सांगितले. सकाळी उठून ते आपल्या गावी गेले. जातानाही त्यांनी आपल्या पोटात जास्त दुखत असल्याचे सासुरवाडीच्या लोकांना सांगितले. त्यानंतर ते कोतुळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याची माहिती फिर्यादीच्या नातवाने त्यांना कळविली. त्यानंतर त्यांना कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे नातवाने त्यांना कळविले होते.

यासंदर्भात यमुनाबाई सारोक्ते यांनी २९ मार्चला राजुर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींविरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील जयंत दिवटे यांनी काम बघितले. ॲड. दिवटे यांनी गुन्ह्याचे स्वरूप न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. खटल्या दरम्यान नामदेव रामा सारोक्ते या आरोपीचा मृत्यू झाला तर नामदेव इंद्रभान सारोक्ते याच्या विरोधात खटला चालविण्यात आला. या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्यायाधीश घुमरे यांनी सरकार पक्ष व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नामदेव इंद्रभान सारोक्ते याला गंभीर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून तीन वर्षे कारावास, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.
