संगमनेरात गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे !

घरगुती गॅस वापराच्या टाक्यांसह सुमारे १५ लाखाचे साहित्य जप्त

पोलीस उपअधीक्षकांना मिळाली होती गोपनीय माहिती

प्रतिनिधी–

पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी तीन गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे टाकले. या दोन्ही ठिकाणाहून भारत, एचपी, इंडेन गॅसच्या घरगुती वापराच्या टाक्यांसह, एक मारुती ओमनी कार, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे पंधरा लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, संगमनेर शहरातील चार ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर करून रिफिलिंग करण्याचा उद्योग करण्यात येत आहेत. त्यामुळे वाघचौरे यांनी पोलीसांच्या चार टीम तयार करून छापे घातले. त्यामध्ये तीन ठिकाणी वरील प्रमाणे अवैध व्यवसाय आढळून आले.

शहरातील अलकानगर परिसरात हावडा ब्रिजच्या पाठीमागे एका लोखंडी टपरीमध्ये व जोर्वे नाका या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत मोहसीन रफिक शेख, वय ३५ वर्ष, इम्रान रऊफ शेख वय ३८ वर्ष, व इम्तियाज रफिक शेख (तिघे रा. अलकानगर, संगमनेर) या तिघांवर तर दुसऱ्या कारवाईत सोहेल शकील शेख वय ३४ वर्ष, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), तिसऱ्या कारवाईत ओंकार राजेंद्र पानसरे (घुलेवाडी, संगमनेर), संपत चिमाजी वाळुंज (गणेशविहार, संगमनेर), जनाराम सुरेश लांडगे (कासारवाडी संगमनेर) व अविनाश राधाकिसन माळी (धुमाळवाडी, अकोले) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी भारत, एचपी, इंडेन गॅस कंपनीच्या घरगुती वापरांच्या गॅस टाक्याचे रिफिलिंग करून, साठा करण्याची परवानगी नसताना विनापरवाना साठा करून जीवनावश्यक पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा धोकादायक पद्धतीने ठेवत विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३, ७ सह एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० कलम ३ व ७ प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३, २८७, १२५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पहिल्या कारवाईत ६८,९००/-रुपयांचा तर दुसऱ्या कारवाईत ३८,९०० रुपयांचा मुद्देमाल, तर तिसऱ्या कारवाईत १४,३१,५१० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला आहे. यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम दत्तात्रय पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव या दोघांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीवरून चौघा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भांन्सी हे करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!