संग्राम पतसंस्थेला फसवले !! 
उद्योजकाला अटक
                      
प्रतिनिधी —
अकोले येथील एका उद्योजकाने अमृतवाहिनी सहकारी बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन  या कर्जासाठी गहाण ठेवलेल्या जमिनीवर कुठलाच बोजा नाही व जमीन कुठेच गहाण नाही असे दाखवत खोटे कागदपत्र तयार करून पुन्हा संग्राम सहकारी पतसंस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज काढले.
ही फसवणूक लक्षात येताच  संग्राम पतसंस्थेने संबंधित उद्योजकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्या उद्योजकाला अटक केली आहे.
प्रवीण विलास देशमुख (रा. नवलेवाडी, ता. अकोले) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याची पत्नी आणि खोटे कागदपत्र तयार करणारा तलाठी मात्र प्रसार आहेत. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
अकोले तालुक्यातील औरंगपूर येथील सर्वे नंबर १ /१ मधील मिळकत सहकार महार्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी बँकेकडे २०१३ साली गहाण ठेवली आहे.
तरी देखील आरोपी यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन, सरकारी दप्तरात फेरफार केला. ही जमीन कोणाकडे गहाण नाही असे खोटे भासवून संग्राम बँकेकडून कर्ज मिळविले. ही घटना सन  २०१६  दरम्यान घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संग्राम बँकेचे मॅनेजर उमेश सुकदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर भिजत पडलेला गुन्हा पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे तपासासाठी आला असता त्यांनी तडक कारवाई करीत अकोले तालुक्यातील उद्योजक  प्रवीण विलासराव देशमुख (वय ४२, रा. नवलेवाडी. ता. अकोले) याना अटक केली आहे.
आरोपीस न्यायालयात हजर केला असता पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
या गुन्ह्यातील इतर आरोपी देशमुख याची पत्नी आणि तलाठी गुलाब विठोबा बारामते (रा. धुमाळवाडी, ता. अकोले) हे अद्याप पसार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहकार महार्षी भाऊसाहेब संतुजी थोरात अमृत वाहिनी बँक संगमनेर यांच्याकडे औरंगपूर मिळकत गहाणखत केलेली आहे. तरी देखील
देशमुख याने संग्राम नागरी पतसंस्थेकडून कर्ज घेण्याचा डाव आखला. त्यात त्याची पत्नी आणि तलाठी बारामते हा देखील सामिल होता.
यांनी याच जमिनीचे पुन्हा दुसरे बनावट कागदपत्र तयार केले.  तलाठ्याच्या मदतीने सरकारी रेकॉर्डमध्ये देखील फेरफार करुन सदर मिळकत कोठेही गहाण नाही. असे खोटे कागदपत्र तयार केले. हे सर्व बनावट रेकॉर्ड संग्राम नागरी पतसंस्थेकडे गहाण ठेऊन पतसंस्थेची फसवणुक केली आणि सुमारे ८० लाख रुपये कर्ज काढले.
दरम्यान, हा सर्व प्रकार संग्राम नागरी पतसंस्थेच्या नंतर लक्षात आला असता अधिकार्‍यांनी त्याबाबत चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की, एकाच जमिनिवर दोन वेळा कर्ज काढण्यात आले आहे. तर कर्जासाठी जे काही कागदपत्रे जोडण्यात आली आहेत ती देखील खोटी असून त्यात झालेले फेरफार तलाठ्याशिवाय कोणी करणार नाही. त्यामुळे, जेव्हा हा घडलेला प्रकार उघड झाला.
तेव्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी प्रवीण देशमुख, त्याची पत्नी  आणि तलाठी गुलाब बारामते यांनी संगनमत करुन स्वत:च्या फायद्याकरीता खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी कागदांमध्ये फेरबदल केले. तसेच पतसंस्थेची फसवणुक केली आहे. त्यामुळे, याप्रकरणी तिघांवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
नव्यानेच संगमनेर पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या
पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी गांभीर्याने या तपासात लक्ष घालत आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!