जीर्ण झालेल्या वडाच्या झाडाला जीवदान !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द या गावातील 160 वर्ष जुने आणि जीर्ण झालेल्या आणि कधीही कोसळून नष्ट होईल अशा वडाच्या झाडाला तेथील तरुणांनी एकत्र येत पुन्हा जीवदान दिले असून आता हा वटवृक्ष चांगला बहरला आहे. वडाच्या झाडाला देव वृक्ष मानले जाते.

येथील ऐतिहासिक पेशवेकालीन गणेश मंदीरासमोरील १६० वर्ष जुना असा हा वटवृक्ष मागील सहा महिन्यांपूर्वी जीर्ण होऊन मोडकळीस झाला होता. त्यामुळे गावातील काही तरुण एकत्र आले व शास्त्रीय पद्धतीने त्यांनी वटवृक्षाचा जीर्ण भाग काढून टाकला, यामध्ये मुळ खोडाचा देखील समावेश होता. त्याठिकाणी असलेले अडथळे आणि घाण देखील या तरुणांनी श्रम करुन काढली होती. यांचं वटवृक्षाच्या एका पारंबीची मागील सहा महिन्यांपासून पूर्ण गाव देखभाल ते करत होते.

दरम्यान या वटवृक्षाला पुन्हा फांद्या फुटल्या असून तो चांगलाच बहरला आहे. या तरुणांमुळे सदर वडाच्या झाडाला जीवदान मिळाले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात नैसर्गिक पाणी आणि आवश्यक ते क्षार मिळाल्यानंतर हे वडाचे झाड अधिक चांगल्या प्रकारे जमिनीत रुजेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वटसावित्री पोर्णिमेच्या निमित्ताने या बहरलेल्या वटवृक्षाने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. त्यामुळे तरुणांनी केलेल्या श्रमाचे चीज झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
