शेततळ्यात बुडून होणारे दुर्दैवी मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात — आमदार सत्यजित तांबे
शिक्षण, कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांना दिले पत्र…
प्रतिनिधी —
शेततळ्यामध्ये बुडून होणाऱ्या दुर्दैवी मृत्यूंना आळा घालण्यासाठी शासनाने उपाय योजना कराव्यात अशी मागणी करत राज्याचे शिक्षण, कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांना आमदार सत्यजित तांबे यांनी विविध सूचना पत्राद्वारे केल्या आहेत.

आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागांत असलेले शेततळे अनेक बालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. शेततळ्यात बुडून लहान बालकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या रोज वर्तमानपत्रात वाचताना मनाला दुःख होतं. शेततळ्यांचे काठ निसरडे असतात, तसेच अनेकदा शेततळ्यात गाळ साचलेला असतो. त्यामुळे शेततळ्यात लहान मुलेच काय, अगदी सराईतपणे पोहणाऱ्या व्यक्तीही बुडण्याची शक्यता असते. यासाठी शेततळ्यातस कुंपण घालणे, टायर ट्यूब, ड्रम अशा वस्तू पाण्यात सोडणे, पायऱ्या तयार करणे, दोरखंड सोडणे अशा उपाययोजना केल्यास अशा दुर्घटना टळू शकतात. तथापि शेततळ्यापासून असलेल्या धोक्यांबाबत विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे.

शालेय शिक्षणात खालील बाबींचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे.
1. शेततळ्याची रचना, त्यापासून असणारे धोके विद्यार्थ्यांना सांगणे.
2. शेततळ्यात पोहण्यासाठी जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे.
3. एखादी व्यक्ती बुडताना आढळल्यास काय करावे याची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
4. प्रत्यक्ष शेततळ्याच्या ठिकाणी “फील्ड व्हीजीट” आयोजित करून विद्यार्थ्यांना असलेल्या धोक्याबाबत गांभीर्य निर्माण करणे.
चांगल्या शेतीसाठी शेततळे आवश्यक असले तरी हे शेततळे कोणासाठी जीवघेणे ठरणार नाही याची पुरेपूर काळजी घेणेही आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.

महाराष्ट्रातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे शेततळे अनेकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी कृषि विभागाच्या वतीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.
खाली दिल्याप्रमाणे दक्षता बाळगल्यास अशा दुर्घटना टळू शकतात.
1. शेततळ्यास कुंपण घालावे. लहान मुलांना प्रवेश करता येणार नाही अशी व्यवस्था करावी.
2. शेततळ्याच्या चारही बाजूला धोक्याची सूचना देणारी पाटी लावावी..
3. शेततळ्यात 3-4 ठिकाणी पायऱ्यांसारखी रचना, दोरीच्या शिड्या किंवा दोरखंड सोडावे.
4. शेततळ्यात 3-4 टायर ट्यूब कायम सोडून ठेवाव्यात.

ग्रामीण भागात सामाजिक शिक्षण व जनजागृती करण्यासाठी ग्रामसभा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हे माध्यम पुन्हा एकदा वापरण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. शेततळ्यापासून असलेल्या धोक्यांबाबत ग्रामीण भागात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांना खालील बाबी समजावून सांगणे गरजेचे आहे.
1. शेततळ्याची रचना, त्यापासून असणारे धोके सांगणे.
2. शेततळ्यात पोहण्यासाठी जाऊ नये यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे.
3. एखादी व्यक्ती बुडताना आढळल्यास काय करावे याची माहिती नागरिकांना देणे.
4. तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेततळ्यापासून असलेल्या धोक्याबाबत समाजात गांभीर्य निर्माण करणे.
(बातमीतील शेततळ्याचे छायाचित्र प्रतिकात्मक आहे.)
