वटसावित्री पोर्णिमेनिमित्त २१०० वटवृक्षांचे रोपन — दुर्गाताई तांबे

प्रतिनिधी — 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हरितसृष्टीसह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणाऱ्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटवृक्ष लागवड सप्ताहात शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर 2100 वटवृक्षांचे रोपन करण्यात येणार आहे. यावर्षीचा वटपोर्णिमा उत्सव एकत्रित कार्यक्रम हा शुक्रवारी दिनांक 21 रोजी कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिर येथे सकाळी 9.00 वा. होणार असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली.

दंडकारण्य अभियान नियोजन बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी डॉ.जयश्री थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, यशोधनचे मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे, प्रा.बाबा खरात, भास्कर पानसरे, एम.के. गुंजाळ, समन्वयक बाळासाहेब सावंत बाळासाहेब फापाळे, नामदेव कहांडळ, सुनिता कांदळकर, कविता पानसरे, के बी दिघे आदी उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या की,  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे अभियान आमदार बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्यप्रवर्तक डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली  लोकचळवळ झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणाऱ्या या चळवळीने देशपातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभागा मुळे या चळवळीला यश आले आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहेत.

वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. आयुर्वेदामध्येही वटवृक्ष, रुई, उंबर, पिंपळ या झाडांना देव वृक्ष म्हणून संबोधले आहे. वटवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने प्रत्येक गावात व वाडीवस्तीसाठी किमान पाच असे तालुक्यात एकूण 2100 वटवृक्षाचे रोपे देण्यात येणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनीच्या हस्ते या झाडाचे रोपन करुन त्याच्या पूजन व संगोपणाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात येणार आहे असेही त्या म्हणाल्या.

डॉ. थोरात म्हणाल्या, की पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने ग्लोबल वॉर्मिगची समस्या उभी राहून उन्हाळ्यात लहान, मोठ्या सजिवांना जगणे असहाय झाले आहे. म्हणून प्रत्येक महिलेने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. घराच्या भोवती परसबाग लावून फळझाडे, फूलझाडे वाढवावी. पुढील पिढीला चित्रातून झाडे दाखविण्याऐवजी प्रत्यक्ष त्या झाडाच्याच सावलीत खेळण्याचा आनंद मिळावा म्हणून दंडकारण्य अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे. महिला वर्गातून या अभिनव उपक्रमाचे मोठे स्वागत करण्यात आले असून संगमनेर तालुक्याचा हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!