पोलिसांनी शोधून दिले हरवलेले मोबाईल !
प्रतिनिधी —
संगमनेर उपविभागात नागरिकांच्या महागड्या मोबाईल चोरीचे प्रमाण मोठे असून अशा चोरी गेलेल्या मोबाईल पैकी १९ मोबाईलचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. त्यातील १२ मोबाईल मूळ मालकांना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते परत करण्यात आले.

मोबाईल चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक सचिन धनाड, राम वेताळ यांनी सायबर सेलच्या मदतीने चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला.

पथकाला संगमनेर शहर व परिसरातून गहाळ झालेले जिओ कंपनीचे नऊ, ओप्पो कंपनीचे तीन, रिअल मी कंपनीचे तीन, वन प्लस कंपनीचे दोन व सॅमसंग कंपनीचे दोन असे १९ मोबाईल आढळून आले. या मोबाईलच्या मूळ मालकांचा देखील शोध घेण्यात आला. यातील १२ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. तर उर्वरित सात मोबाईलच्या मालकांशी संपर्क करण्यात आला असून त्यांना मोबाईल परत केले जाणार आहे.
दरम्यान चोरी गेलेले मोबाईल परत मिळणार नाहीत या आशेने मोबाईलचा शोध सोडून दिलेल्या मोबाईल मालकांना मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर पोलिसांबद्दल समाधानाचे भाव निर्माण झाले होते.

संगमनेर उपविभागांतील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले, राजुर पोलीस स्टेशन हंद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मोबाईल हरवल्यास पोलीस स्टेशनला मोबाईल मिसिंगबाबत नोंद करावी. जेणेकरुन सायबर सेलच्या मदतीने हरविलेल्या मोबाईलचा शोध घेता येईल.
– सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक, संगमनेर
