घरफोडी करणारी टोळी पकडली !
सोन्या चांदीचे दागिने हस्तगत ; तिघांना अटक
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे करून सोने चांदी आणि रोख रकमेची चोरी करणाऱ्या आरोपींची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून तिघांना अटक केली आहे. या आरोपींकडून सोने आणि चांदीचे दागिने असे एकूण 5 लाख 38 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

किशोर तेजराव वायाळ (वय 42, राहणार मेरा बुद्रुक, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) गोरख रघुनाथ खळेकर (वय 37, राहणार शिरसवाडी, जालना) विष्णू हरिश्चंद्र हिंगे (वय 32, राहणार चंदनहिरा कॉलनी, जालना) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच रुद्राक्ष पवार (राहणार लाखनवाडा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा) हा फरार आहे. वरील आरोपींनी अहमदनगर, नेवासा, चाळीसगाव, जळगाव, पैठण, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे.

आरोपी किशोर वायाळ हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर जालना, बुलढाणा अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घरफोडीचे एकूण ५० गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी विष्णू हरिश्चंद्र हिंगे यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये फसवणे, जबरी चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत आणि गोरख रघुनाथ खळेकर याच्याविरुद्ध जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, घरफोडी असे एकूण 18 गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोंढे, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, प्रमोद जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, मयूर गायकवाड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली आहे.
