गर्भपात करण्यासाठी पत्नीला मारहाण करीत बळजबरीने गोळ्या चारल्या !
तीन ठिकाणी उपचार करूनही त्या स्त्रीचे अतोनात हाल झाले…
पतीला अटक – सासू-सासरा पसार… पळून जाण्यास तपास अधिकाऱ्यानेच दिली संधी..
प्रतिनिधी —
मुल नको असल्याने गर्भवती पत्नीला तिचा नकार असतानाही बळजबरीने मारहाण करीत गोळ्या खायला घालून तिचा गर्भ पाडण्याचा प्रकार पती, सासू-सासरे यांनी तिघांनी मिळून केला असल्याची घटना समोर आली असून या अन्यायग्रस्त स्त्रीवर संगमनेर, साकुर येथे खासगी डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी नेल्याचेही उघड झाले आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी पीडित स्त्रीच्या फिर्याद्रीवरून पती, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली असून सासू-सासरे पसार झाले आहेत.

शुभम साहेबराव हुलवळे (राहणार दरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, नवरा) यास अटक करण्यात आली असून सासू अर्चना आणि सासरे साहेबराव हे दोघेजण पसार झाले आहेत. अश्विनी शुभम हुलवळे (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान पिडीतेच्या पतीला अटक केली असली तरी यातील आरोपी सासू-सासरे यांना पसार होण्यास तपास अधिकाऱ्यानेच मदत केली असल्याची चर्चा सुरू आहे.

सदर पीडित महिलेला तीन वर्षाचा मुलगा असून ती पुन्हा गरोदर असताना आपल्याला मूल नको म्हणून तिच्या पतीने ती तयार नसताना तिला मारहाण करण्यात आली तसेच तिच्या पोटातील गर्भ वाढण्यासाठी तिला सासू सासर्यांनी आणि पतीने मारहाण करीत बळजबरीने पकडून तिचे तोंड उघडून तिच्या तोंडात गोळ्या टाकल्या ज्याने तिला अतिशय त्रास होऊन व रक्तस्राव होऊन गर्भपात झाला.

पीडित महिलेने गोळ्या घेण्यास नकार दिला असता बळजबरी करून सासू-सासर्याने तिचे हात पाय पकडले सासुने दोन्ही हात धरून ठेवले व सासरे यांनी पाय धरून ठेवले आणि पतीने तिच्या तोंडात गर्भपाताच्या चार गोळ्या टाकून तिला खाऊ घातल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेला रात्री पोटात खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. म्हणून तिला साकुर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन दिवस त्या ठिकाणी तिला सलाईन लावून उपचार करण्यात आले परंतु काही फरक न पडल्याने संगमनेर येथे मोठ्या दवाखान्यात जाण्यास डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी नणंद सोनाली गुळवे आणि पती शुभम यांनी सदर महिलेला संगमनेर येथील खासगी दवाखान्यात पुन्हा दाखल केले. तेथे सोनोग्राफी केली. इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या नंतर सायंकाळी घरी आल्यानंतरही सदर महिलेला पुन्हा रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे जवळजवळ आठ ते दहा दिवस या महिलेला अतिशय शारीरिक त्रास झाला. तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता अशाही परिस्थितीत सासू-सासरे यांनी पतीने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे सदर महिलेने घारगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले व त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर सदर महिलेला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात येऊन तिने सविस्तर फिर्याद दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर महिलेचा पती शुभम याला अटक केली असून सासू-सासरे मात्र पळून गेले आहेत. आरोपींचा शोध चालू आहे.

