पोलिसांचा गोलमाल ! दाखवले पाच टन.. सापडले तेरा टन !!
संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात तब्बल १३ टन गोमांस पकडले !
तालुका पोलिसांची कारवाई ; दोघांना पकडले
प्रतिनिधी —
अनेक वेळा छापे टाकूनही निर्ढावलेल्या गोवंश कत्तल करणाऱ्या कसायांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. अगदी पोलिसांच्या नाकावर टिचून जनावरांची अवैध कत्तल चालू असल्याचे दिसून येत असले आणि गुन्हे दाखल होत असले तरीही हा अवैध धंदा करणाऱ्यांचा मस्तवालपणा कमी झालेला नाही. संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात संगमनेर तालुका पोलिसांनी तब्बल १३ हजार किलो (१३ टन) गोवंश मांस पकडले असून संगमनेरात किती मोठ्या प्रमाणात गोवंश मांसाची वाहतूक केली जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

तालुक्यातील कासारे गावच्या शिवारातील जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता. पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले व सदर ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.

जाकीरखान नसीरखान पठाण (वय ४९, रा. मोगलपुरा, संगमनेर ) व अय्युब मेहबूब कुरेशी (वय ५३, रा. कुरणरोड, इस्लामपुरा, संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

वरील दोघे संशयित आरोपी आयशर ट्रक क्रमांक एमएच. १७, बीवाय ७८२४ मधून गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर बजरंग दलाचे कार्यकर्ते शाम पसाद थोरात, शाम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोज कुमार कालडा यांंनी हा ट्रक अडवला व तालुका पोलिसांना माहिती कळवली. त्यानुसार पोलीस हवालदार राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडधे. यांनी घटनास्थळी जाऊन सदर ट्रक ताब्यात घेतला. याप्रकरणी हवालदार दत्तात्रय बडधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांवर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डी. जी. दिघे हे करत आहेत.

पोलिसांचा गोलमाल !
संगमनेरच्या गोवंश मांस तस्करीत पोलिसांचाही सहभाग असल्याचे आरोप नेहमी झाले आहेत. या गंभीर आरोपांकडे वरिष्ठांचे देखील नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. ट्रक पकडल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी फक्त ५ हजार किलो (५ टन) गोवंश मांस त्या ट्रकमध्ये असल्याचा गुन्हा नोंदविला होता. परंतु बजरंग दलाच्या जागृत कार्यकर्त्यांमुळे या ट्रकमध्ये तब्बल १३हजार किलो (१३ टन) गोवंश मांस असल्याचे उघड झाले. संगमनेर तालुक्यातील लोहारे या ठिकाणी या ट्रकचे वजन केले असता मूळ वजनातून ट्रकचे वजन वजा केल्यानंतर १२ हजार ७९० किलो वजनाचे गोवंश मांस या ट्रकमध्ये असल्याचे आढळून आले. त्यामुळे आधी पोलिसांनी संपूर्ण आकडा लपवला असल्याचे यातून उघड झाले. वरील ८ टन गोवंश मांस गायब करण्याचा पोलिसांचा नेमका हेतू काय ? हा गोलमाल कशासाठी आणि कोणासाठी केला जात होता ? त्याचे वाटेकरी कोण कोण ? असे प्रश्न उपस्थित झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत मौन बाळगले आहे.

सदर ट्रक मध्ये पाच टना पेक्षा जास्त गोवंश मांस असल्याचा संशय आम्हाला सुरुवातीपासूनच होता. आम्ही वेळोवेळी पोलिसांना तसे सांगितले. वजन करण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी हे वजन पाच हजार किलो आहे असेच लावून धरले. आणि पाच टन गोवंश मांसाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सायंकाळी सदर मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आले. तेव्हा गाडीभोवती लावलेली ताडपत्री उघडल्यानंतर हे मांस जास्त असल्याची आमची पुन्हा खात्री झाली. मग मात्र जोपर्यंत गाडीचे पुन्हा वजन केले जात नाही तोपर्यंत गोवंश मासाची विल्हेवाट लावू देणार नाही अशी भूमिका आम्ही घेतल्यानंतर गाडीचे लोहारे येथे वजन केल्यानंतर हे गोवंश मांस जवळ जवळ १३ टन (१२,७९० किलो) असल्याचे उघड झाले.
कुलदीप ठाकूर, संयोजक, बजरंग दल संगमनेर

सुरुवातीला गाडी ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल करताना अंदाजाने ५ हजार किलो गोवंश मांस ट्रक मध्ये असल्याची नोंद केली होती. मात्र नंतर सर्व मांसाची विल्हेवाट लावताना त्यामध्ये मांस जास्त असल्याचे आढळून आल्याने पुन्हा वजन केल्यानंतर ते १३ हजार किलो असल्याचे आढळून आले. त्यामुळे पुन्हा पुरवणी जबाब घेऊन, पंचनामा करून उर्वरित आठ हजार किलो वजन गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
देविदास ढुमणे पोलीस निरीक्षक, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन
