पुन्हा… ७१० किलो गोवंश मांस आणि ५७ जनावरे पकडली !
स्थानिक गुन्हे शाखा नगरची कारवाई
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यात गोवंश कत्तलींनी कळस गाठला असून स्थानिक गुन्हे शाखेने ७१० किलो गोमांस आणि ५७ गोवंशीय जनावरे पकडली आहेत. कर्जत तालुक्यातील राशीन येथे ही कारवाई करण्यात आली असून १३ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण नगर जिल्ह्यातील गोवंश कत्तली चव्हाट्यावर आल्या आहेत.

संगमनेर पाठोपाठ कर्जत तालुक्यात ही कारवाई झाली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथे कुरेशी मोहल्ला या ठिकाणी गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती आणि कत्तलीसाठी आणलेली जिवंत जनावरे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाल्यानंतर पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. आरोपींच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ७१० किलो गोमांस ५७ लहान-मोठे जिवंत व गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी हे सर्व जप्त केले असून त्याच बरोबर दोन मालवाहू पिकअप जीप देखील जप्त केल्या आहेत.

शहाबाज आयुब कुरेशी (राहणार कुरेशी मोहल्ला, राशिन, तालुका कर्जत) सोहेल कुरेशी, सुलतान कुरेशी हे सर्व आरोपी पोलिसांची चाहूल लागताच गल्लीबोळांचा फायदा घेत फरार झाले आहेत.
या छाप्यात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय इंगळे, विश्वास बेरड, विशाल दळवी, संदीप दरंदले, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, अरुण मोरे यांनी सहभाग घेऊन कारवाई केली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

