ठाकरे परिवाराची पुन्हा बदनामी…
व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
वारंवार सोशल मीडियाचा गैरवापर करूनही पोलिसांची बघ्याची भूमिका
प्रतिनिधी —
गेल्याच आठवड्यात व्हाट्सअपवर करण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवरील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा याच ग्रुपच्या ॲडमिनवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संगमनेर शहर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होईल, दोन धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या पोस्ट काही विघ्न संतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर टाकल्या जातात. संगमनेरमधील माध्यमही यात मागे नाही. बऱ्याच व्हाट्सअप ग्रुपवर अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने शहरातील शांततेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलीस व प्रशासनाकडून अशा प्रकारच्या व्हाट्सअप ग्रुपवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर निगराणी ठेवणे आवश्यक बनले आहे.

संगमनेर मधील “सौ शहरी तो एक संगमनेरी” या व्हाट्सअप ग्रुप वर गेल्या आठवड्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या बद्दल जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारची भाजप पदाधिकाऱ्याने टाकल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. पाठोपाठ महायुतीनेही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून वाद निर्माण होतील अशा पोस्ट टाकल्या जात असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत तक्रार, निवेदन वॉर रंगले होते.

मंगळवारी याच ग्रुपवर ग्रुप ॲडमिन संजय तवरेज (बंडू क्षत्रिय) यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यावर तसेच शिवसैनिकांवर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यामुळे याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे ॲडमिनवर सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासाठी निवेदनासोबत त्यांनी वादग्रस्त पोस्टचे पुरावे जोडले.

माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे राजू सातपुते, उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, पंकज पडवळ, अमोल डुकरे, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्तियाज शेख, शाखाप्रमुख प्रकाश चोथवे आदी उपस्थित होते.

सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा…
या वादग्रस्त व्हाट्सअप ग्रुपवर ॲडमिन संजय उर्फ बंडू क्षत्रिय यांनी स्वतःच्या मोबाईल नंबरवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व ठाकरे परिवारावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. शिवसैनिकांना हिणवत ठाकरे परिवारावर टीका केल्याने आमच्या भावना दुखावल्या आहे. काही दिवसांपूर्वी याच ग्रुपवर ॲडमिन व इतर लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची बदनामी होईल व त्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून जाणीवपूर्वक फोटो शेअर व फॉरवर्ड केले होते. यावेळी सुद्धा शिवसेना पक्ष व महाविकास आघाडीच्यावतीने संगमनेर शहर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु या ग्रुपचे ॲडमिन संजय उर्फ बंडू क्षत्रिय हे पुन्हा-पुन्हा पोस्ट करत आहेत. यापूर्वी त्यांना दोन वेळा पोलीस प्रशासनाने नोटीसा देऊनसुद्धा ते सुधारलेले नाहीत. त्यांच्यावर पोलिसांनी सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा.
अमर कतारी, माजी शहरप्रमुख, शिवसेना
