लग्नास नकार दिला म्हणून मौलानाने मुलीच्या वडिलांचा गळा आवळून खून केला !
मौलानासह एकाला अटक, तर एक जण पसार
प्रतिनिधी —
मुलीचे लग्न लावून देण्यास नकार दिल्याने एका मौलानाने मुलीच्या वडिलांचा खून करण्याची घटना संगमनेरात उघडकीस आली असून उत्तर प्रदेश मधील त्या मौलानासह त्याच्या एका साथीदाराला उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. तर आणखी एक आरोपी पसार आहे.

मोहम्मद जाहिद मोहम्मद मुलतानी, (वय ३६, मौलाना, राहणार सहारनपुर, उत्तर प्रदेश) मोहम्मद इमरान निसार सिद्दिकी (राहणार कल्याण) या दोघांना अटक करण्यात आली असून मोहम्मद फैजान शमीम अंसारी (राहणार बगदाद अन्सार, तालुका धामपूर, जिल्हा बिजनोर) हा संशयित आरोपी पसार आहे. तर आहतेशाम इलियास अन्सारी असे मयताचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सुमारे आठ महिन्यापूर्वी सहारनपुर उत्तर प्रदेश येथील मोहम्मद जाहीद मोहम्मद युनूस मुलतानी हा मौलाना चंदा मागण्यासाठी उत्तर प्रदेश येथून संगमनेर येथे आला होता. सदर मौलाना हा मयताच्या बेकरीमध्ये राहण्यास होता. मौलानाने दोन महिन्यापूर्वी मयत आहतेशाम अन्सारी यांना लग्नासाठी मुलगी द्या अशी मागणी घातली. मात्र मौलाना हे काम करण्यासाठी बाहेर फिरत असल्याने मयत आहतेशाम यांनी मुलगी देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मौलानाने ‘तुमने ऐसे तरीके से लडकी नही दि तो मुझे दुसरा तरीका भी आता है, मै तुमको बरबाद कर डालुंगा.’ अशी धमकी दिली होती. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे या मौलानाला बेकरीचे मालक मयत आहतेशाम यांनी घरातून काढून दिले होते.

त्यानंतर काही दिवसांनी मयत आहतेशाम अन्सारी हे घरातून दोन लोकांच्या जेवणाचा टिफिन डबा घेऊन बाहेर पडले. मात्र ते घरी परतलेच नाहीत. त्यांची शोधा शोध घेऊनही ते घरी आले नसल्याने शहर पोलीस ठाण्यात मिसिंग ची खबर देऊन नोंद करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील मालदाड गावच्या शिवारात जंगलात एक अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आले. या प्रेताची बातमी मयताच्या मुलाला समजली. त्यांनी मयताची पाहणी केली असता त्यांचे वडीलच असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना तसे सांगितले. मात्र मयताचा मृत्यू हा नैसर्गिक झाला नसून त्यांचा खून झाला असा संशय मयताच्या मुलाला होता. त्यामुळे मयताचा मुलगा जुनेद आहतेशाम अन्सारी (वय 21 राहणार मदिना नगर, जुना जोर्वे रोड, अक्सा मशीद जवळ, संगमनेर) याने वरील तिघांविरुद्ध फिर्याद देऊन असे सांगितले की, सदर मौलानाशी माझ्या बहिणीचे लग्न लावून दिले नाही याचा राग येऊन या तीनही आरोपींनी माझ्या वडिलांचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला असून त्यांचा मोबाईल देखील सोबत घेऊन पळून गेले. पोलिसांनी अधिक तपास करून हा खूनच असल्याचे उघड केले.

त्यानंतर सदर मौलाना हा बऱ्याच दिवसांपासून गायब असल्याची माहिती मिळाली. संगमनेर पोलीस पथकाने उत्तर प्रदेश येथे जाऊन मोठ्या शिताफिने मौलानाला व त्याच्या साथीदाराला पकडले असून दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे.
