पोलीस उपअधीक्षक आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाचा पुन्हा संगमनेरच्या कत्तलखान्यावर छापा !
६०० किलो गोवंश मांस पकडले
प्रतिनिधी —
संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या धडाका पोलिसांनी लावला असून रविवारी रात्री पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील पथक आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकून 600 किलो गोवंश मांस पकडले असून एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, जुना जोर्वे रोड, मदिना नगर, संगमनेर या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच 17 बीडी 4182 या गाडीमध्ये गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल केलेले मांस भरून जात आहे.

त्या ठिकाणी वरील पथकाने छापा टाकला असता संबंधित पांढऱ्या रंगाच्या पिकअप मध्ये गोवंश मांस आढळून आले. हे मांस पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आणि तनवीर इकबाल शेख (वय 34, राहणार मदिना नगर, गल्ली क्रमांक चार, संगमनेर) यास अटक केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल गणेश पांडुरंग थोरात यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक माळी तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे या पथकाने ही कारवाई केली आहे.
