दरोड्याच्या तयारीत असलेले तिघेजण पकडले ; पाच जण पसार
1 लाख 47 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई
प्रतिनिधी —
तीन मोटर सायकल वरून दरोडा घालण्यासाठी आलेल्या आठ दरोडेखोरांवर छापा टाकला असता यातील तीन दरोडेखोर हाती लागले असून पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी श्रीगोंदा तालुक्यात ही कारवाई केली आहे.

आदिक आजगन काळे हा सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारांसह मोटार सायकलवर येऊन वेठेकर वाडी ते पांढरेवाडी जाणाऱ्या रोडवर ओढ्यामध्ये वेठेकरवाडी (तालुका श्रीगोंदा) येथे थांबून परिसरात कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसलेले असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन रोडच्या कडेला झुडपामागे दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांवर छापा टाकला. पथकाची चाहूल लागताच हे गुन्हेगार पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करून तीन जणांना पथकाने पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

यातील पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे पुढीलप्रमाणे आदिक आजगन काळे (वय 50) व समीर आदिक काळे (वय 22, दोन्ही राहणार म्हसणे, तालुका पारनेर) व आकाश रवींद्र काळे (वय 21, राहणार गटेवाडी, तालुका पारनेर) अशी आहेत. तर पळून गेलेल्या पाच गुन्हेगारांची नावे पुढील प्रमाणे आहेत. वारूद भास्कर चव्हाण, कोक्या भास्कर चव्हाण, अजय संतोष भोसले, सतीश भास्कर चव्हाण, (सर्व राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा) व राहुल अर्पण भोसले (राहणार म्हसणे, तालुका पारनेर) असे आहे.

पकडलेल्या तीन संशयित गुन्हेगारांकडून एक कत्ती, एक कटावनी, एक सुरा, मिरची पूड, दोन मोबाईल फोन, होंडा कंपनीची मोटर सायकल असा एकूण 1 लाख 47 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र तुकाराम घुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे सर्व आरोपी सराईत आहेत.
यातील आरोपी आदिक आजगन काळे याने संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, सुपा या ठिकाणी दरोडे घातले आहेत. तर समीर आदिक काळे याने सुपा पारनेर तालुक्यात गुन्हे केले आहेत.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बबन मखरे, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, संतोष लोंढे, देवेंद्र शेलार, फुरकान शेख, संतोष खैरे, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, किशोर शिरसाट, संभाजी कोतकर यांनी सहभाग घेतला होता.

