गोवंश कत्तल करणाऱ्यांवर शहर पोलिसांचा छापा !
1750 किलो गोवंश मांस जप्त ; दोघांना अटक
प्रतिनिधी —
संगमनेर शहरांमध्ये गोवंश हत्या करून गोवंश मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावण्यात आला असून शहर पोलिसांनी छापा टाकत 1750 किलो गोवंश मास जप्त केले आहे. दोघाजणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई चर्चेत असून यापुढेही सातत्याने कारवाई चालूच राहील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाली की, शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात केजीएन गॅरेज जवळ मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस भरले जात आहे. याची खात्री करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक मथुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक बीबी घोडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण थटार, पोलीस हेडकॉन्स्टेबल लुमा भांगरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाट या सर्वांना समक्ष बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर रात्री 11 वाजेनंतर या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता लाल रंगाचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच 17 बी वाय 0489 उभा असलेला दिसला. सदर ठिकाणी खात्री करून टेम्पो ताब्यात घेतला असता या टेम्पोमध्ये गोवंश जातीचे मांस भरलेले आढळून आले व त्या ठिकाणी नईम सुलतान शेख (वय 20 वर्षे, राहणार श्रमिक नगर, तालुका संगमनेर) आणि रेहान अल्ताफ शेख (वय 19 वर्षे, राहणार इस्लामपुरा, दिल्ली नाका, तालुका संगमनेर) असे दोघेजण आढळून आले त्यांच्याकडे मांस कापण्याचा आणि वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सदर मांस तपासले असता त्याचे वजन अंदाजे 1750 किलो असून हे सर्व मांस ताब्यात घेतले. तसेच लाल रंगाचा आयशर टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आला आहे.

वरील प्रमाणे कारवाई केल्यानंतर पोलिसांनी गोमांस सॅम्पल हे केमिकल तपासणी कामी काढून घेऊन सॅम्पल राखून ठेवले आहे. उर्वरित गोवंश मांस याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण थटार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बीबी घोडे हे करीत आहेत.

शहरात होणारी गोवंश कत्तल रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपअधीक्षकांचे पथक तसेच एलसीबी चे पथक सातत्याने संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यांवर कारवाया करत आहे. त्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नसून कारवाई सुरूच राहणार आहे.
भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संगमनेर शहर
