बिबट्यापासून बचावासाठी संगमनेर अकोले तालुक्यातील सुमारे ३०० शाळेतील ४० हजार विद्यार्थ्यांचा ‘ऑनलाईन’ जागर !

पोलीस, वनविभाग व पंचायत समिती संगमनेर व अकोले तालुक्यात प्रशासनाचा संयुक्त उपक्रम — जवळे कडलग येथे प्रबोधन

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर आणि अकोले तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी डॉ. कुणालसोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या संकल्पनेतुन पोलीस व वनविभाग तसेच पंचायत समिती संगमनेर व अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. ‘बिबट्याः समस्या आणि उपाययोजना’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळे कडलग येथून युट्युब लिंकच्या (YouTube Link) माध्यमातून आयोजित या प्रबोधन वर्गात संगमनेर आणि अकोले तालुक्यातील 299 शाळांमधील सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेत ‘RYDES’ चे संचालक विवेक दातीर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बिबट्याची वागणूक ओळखणे, बिबट्या प्रवण क्षेत्रात वावरताना घ्यायची काळजी आणि अनपेक्षित प्रसंगात स्वतःचा बचाव कसा करावा, याचे तंत्र त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, संगमनेर परिक्षेत्र वन अधिकारी सागर केदार, गटशिक्षण अधिकारी गुंड यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वन आणि पोलीस विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी बिबटयापासुन स्वसरंक्षणा बाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.या उपक्रमानंतर पथकाने जवळे कडलग ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष चर्चा केली. शेतात काम करताना किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडताना समूहाने जावे, टॉर्चचा वापर करावा आणि लहान मुलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशा सूचना प्रशासकीय अधिका-यांनी दिल्या, गटविकास अधिकारी संगमनेर प्रविण सिनारे तसेच गटविकास अधिकारी अकोले यांच्या माध्यमातुन शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हे महत्त्वाचे संदेश पोहोचवणे शक्य झाले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!