डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या समाज प्रेरणा पुरस्कारांचे वितरण !

संगमनेरात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 

 

कार्यक्रम प्रसंगी बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक झाले पाहिजे अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी या मागणीला पाठींबा देत संगमनेरात दोन्ही महामानवांचे पूर्णाकृती स्मारक करण्यात येईल अशी घोषणा केली. या घोषणेचे सर्व उपस्थितांनी जोरदार स्वागत केले.

 

प्रतिनिधी —

संगमनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने समाज प्रेरणा पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते आदित्य घाडगे, तळेगाव दिघे येथील अशोक जगताप यांना समाज प्रेरणा पुरस्कार तर प्रा. जी. बी. कदम यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जयंती उत्सवाची सुरवात अभिवादन सभेने करण्यात आली. प्रास्तविक विनय घोसाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देशातील अस्थिर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत संविधान वाचवण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. वर्तमानस्थितीत डॉ. बाबासाहेबांचे विचारच केवळ देशाला वाचवू शकतील अशी आग्रही भूमिका मांडली.

राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी डॉ. बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याची गरज आहे त्यासाठी प्रतिगामी शक्तींना चोख उत्तर दिले पाहिजे असे उपस्थितांना आवाहन केले. हिरालाल पगडाल यांनी विरोधी पक्षांमधल्या दुफळी बद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून देशासमोरील खरे आव्हान नेमके काय आहे हे समजावून घेण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना किंमत चुकवावी लागली तरी चालेल असे प्रतिपादन केले.

माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आंबेडकर प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला आणि गेली अनेक वर्षे राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी दुर्गाताई तांबे, बाबा खरात आणि पार्वतीबाई यांनी भीमगिते गाऊन सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रमुख अतिथी डॉ. जयश्री थोरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणाचे आणि त्यांच्या संविधान निर्मितीच्या योगदानाचे समर्पक शब्दात विश्लेषण केले. संविधान हाच आपल्या देशाचा मूळ पाया असून त्याला धक्का लागता कामा नये यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे असे आवाहन केले.

या प्रसंगी पुरस्कार प्राप्त मान्यवरांना मानपत्र, सन्मानचिन्ह, भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आले. पुरस्कार विजेत्यांच्या सौभाग्यवतींचा दुर्गाताई तांबे आणि कुसुमताई माघाडे यांचे हस्ते साडी देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम परिसरात ग्रंथ विक्री व  प्रदर्शन  आयोजित करण्यात आले. शहरातील वाचनप्रेमींनी या ग्रंथ प्रदर्शनाचा आनंद घेतला.

यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर.कदम, उपाध्यक्ष के. एस. गायकवाड, सहसचिव ए. पी. बनसोडे, अण्णासाहेब आडांगळे, रामनाथ जगताप, बाळासाहेब राऊत, कैलास बड, बाबा खरात, पार्वतीबाई  इत्यादी उपस्थित होते. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी विनोद गायकवाड, ॲड. अमित सोनवणे, प्रा. शशिकांत माघाडे, डॉ. संदीप गोसावी, असिफ शेख, प्रवीण रुपवते, हेमंत मेढे, राम चण्णा, प्रकाश पारखे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गायकवाड तर आभार प्रदर्शन दिलीप भोरुंडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!